मराठे तळपले, सरकार नरमले! ओबीसींप्रमाणे सवलती मिळणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

वर्षभरात तब्बल 57 मराठा क्रांती मूक मोर्चांनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढल्यानंतर मराठा समाजाचा अफाट मोर्चा आज मुंबईत धडकला. सकाळी 11 वाजता भायखळा वीर जिजामाता उद्यानापासून निघालेला हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व मोर्चा आझाद मैदानात पोहोचला तेव्हा त्याचे शेवटचे टोक परळ-लालबागपर्यंत होते. या विराट मोर्चातून मराठा क्रांतीचे तेज तळपल्याने महाराष्ट्र सरकारही अखेर नरमले. मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणेच शैक्षणिक सवलती मिळतील, 605 अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीतील गुणांची अट 50 टक्के करण्यात येईल आणि प्रत्येक जिह्यात वसतिगृहासाठी पाच कोटींचे अनुदान देण्यात येईल, अशा महत्त्वाच्या घोषणा करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

जातपडताळणीच्या अटी दूर करणार! मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 36 अभ्यासक्रमांत दिली जाणारी शिष्यवृत्ती आता 605 अभ्यासक्रमांसाठी दिली जाईल. यासाठी असलेली गुणांची 60 टक्क्यांची अट रद्द करून ती 50 टक्क्यांवर आणण्यात येईल. त्याचप्रमाणे मराठा समाजातील मुला-मुलींसाठी प्रत्येक जिह्यात वसतिगृह सुरू करण्यासाठी पाच कोटींचे अनुदान दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळाला आज दिले. मराठा, कुणबी आदी 18 जातींच्या लोकांना जात प्रमाणपत्र मिळताना येणाऱया अडचणी दूर केल्या जात असून रक्ताच्या नातलगांना जात पडताळणी मिळण्यातील कायदा दुरुस्ती ही अंतिम टप्प्याकर आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी आलेल्या मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांबाबत निवेदन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चाच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे निवेदनात सांगितले. ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकारी तसेच विरोधी बाजूचे सारेच सदस्य मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आहेत. आपण त्यासाठी एकमताने कायदाही केला, पण त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. आता उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या समावेशाचा मुद्दा मागासवर्ग आयोगाकडे सोपवला आहे. शासनाने हा आयोग गठीतही केला असून ठरावीक कालमर्यादेत अहवाल न्यायालयाला सादर करण्यास सांगितले जाईल.

कोपर्डी घटनेवर लवकरच निर्णय

मुख्यमंत्री म्हणाले की, कोपर्डी बलात्कार प्रश्नावर मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या भानना तीव्र होत्या. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊनच शासनाने गतीने जलदगती न्यायालयाची स्थापना केली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 31 साक्षीदार तपासून केवळ पाच महिन्यांत प्रकरण अंतिम टप्प्यावर आणले. मात्र आरोपींच्या वकिलांनी वेळकाढूपणा सुरू केला. त्याबद्दल न्यायालयाने त्यांना दंडही ठोठाकला. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यासह काही साक्षीदार तपासण्याचा अर्ज केला. तो फेटाळल्यावर ते उच्च न्यायलयात गेले. तेथे त्यांना केवळ एक साक्षीदार तपासण्याची परवानगी मिळालेली आहे. या खटल्यात होणारी शिक्षा मोठी असल्यामुळे न्यायलयालाही सारी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पण कोपर्डीचा खटला तार्किक अंताकडे जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मराठा संघटनांसाठी बोलण्यासाठी समिती

मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात येईल. ही समिती दर तीन महिन्यांनी मराठा संघटनांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांबाबत आढावा घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जे भव्य स्मारक अरबी समुद्रात होणार आहे त्याची टेंडर अंतिम करण्यासाठी आता मुख्य सचिवांच्या समितीकडे जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पुरातत्व खात्याच्या संमतीने रायगड किल्ला संवर्धनाचे कामही सुरू होत असून याला केंद्राच्या आर्केलॉजिकल विभागाचीही परवानगी मिळाली आहे. अन्य गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे कामही हाती घेतले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मराठा शिष्टमंडळाला दिले.

मुस्लिम आरक्षणासाठी मुस्लिम आमदार आक्रमक

सरकारने मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लिमांनाही पाच टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी करीत मुस्लिम आरक्षणावरही निवेदन करण्याचा आग्रह समाजवादी पार्टीचे अबू आझमी, काँग्रेसचे नसीम खान व एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी धरला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मुस्लिम ओबीसी व मुस्लिम एससी यांना आरक्षणाचे लाभ मिळतच आहेत. पाच टक्के आरक्षणाबाबत उच्च न्यायालयानेही भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारचीही त्यावर काही स्पष्ट मते असून आम्ही संविधानाला बांधील आहोत. या विषयाकर सदस्यांनी चर्चा उपस्थित केली तर सरकार उत्तर देईल.
मराठा तरुणांना 10 लाखांचे कर्ज

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडे 200 कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्या महामंडळातर्फे तीन लाख मुलांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याचप्रमाणे व्यवसायासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज देऊन त्या कर्जावर महामंडळाच्या माध्यमातून व्याज सवलतही दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मोर्चाच्या गर्दीत चोरट्यांची हातसफाई

मराठा मोर्चाच्या गर्दीत चोरट्यांनी चांगलाच हात मारला. सोनसाखळी चोरीच्या सुमारे वीस घटना घडल्या. विविध पोलीस ठाण्यांत याप्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोबाईल आणि पाकीट पडलेल्यांच्यादेखील अनेक तक्रारी असून ते पडले की चोरी झाले याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, एका मोबाईल चोराला आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

कोपर्डीच्या बहिणीला न्याय कधी?

कोपर्डी घटनेला वर्ष होऊन गेले तरी आमच्या निरपराध भगिनीला अजूनही न्याय मिळाला नाही. नागपूरच्या साहेबांना विचारलं, माझ्या कोपर्डीच्या बहिणीला न्याय कधी मिळणार? तर ते म्हणाले, ‘फास्ट ट्रक न्यायालयात लवकरच न्याय मिळेल, पण अद्याप न्याय काही मिळाला नाही. असं होत असेल तर आमच्यासारख्या मुलींनी कसं जगायचं या जंगलात, असा संतप्त सवाल मोर्चात सहभागी झालेल्या मुलींनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

तोंडाला पानं पुसली!

सरकारने मराठा समाजाच्या कोणत्याही मागण्यांबाबत ठोस पावले उचलली नसून या मोर्चाच्या अंती सरकारने जुनीच आश्वासने नव्याने देऊन मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज केली.

सरकार दिशाभूल करतेय!

गेल्या दोन वर्षांपासून मराठा, मुस्लिम, धनगर समाजाचे राज्यभरात मोठमोठे मोर्चे निघत असताना सरकारकडून फक्त दिशाभूल सुरू आहे. त्याचा मोठा उद्रेक मुंबईतील मराठा मोर्चाच्या माध्यमातून झाला आहे, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली.

कोटय़वधी मराठा बांधवांचा अपेक्षाभंग झाला असून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी व राज्य सरकारने पुन्हा एकदा केले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांनी सकल मराठा समाज मात्र निराश, नाराज व संतप्त आहे, अशा भावना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात व्यक्त केल्या.

काय घडले?

  • आजच्या निर्णायक मराठा क्रांती मोर्चासाठी मंगळवारी रात्रीपासूनच मोर्चेकरी मुंबईत दाखल झाले.
  • सकाळी 11च्या सुमारास भायखळय़ाच्या जिजामाता उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मात्र त्याआधीच लाखो मोर्चेकऱयांचे जथे आझाद मैदानात धडकले होते.
  • दुपारी अडीचच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली.
  • शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केले.
  • मागण्या मान्य झाल्याचे जाहीर करत सायंकाळी 4.30च्या सुमारास विराट मोर्चाची सांगता करण्यात आली.

मोहम्मद अली रोडवर शुकशुकाट

कायम गर्दीने गजबजलेल्या मोहम्मद अली रोडवर बुधवारी शुकशुकाट होता. बहुतांश कार्यालये, होलसेल मालाची दुकाने, शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. वाहनांबरोबरच रस्त्यावर लोकांची ये-जादेखील तुरळक होती. फेरीवाले, हातगाडीवाल्यांचीही वर्दळ नव्हती. शाळा नसल्याने विद्यार्थी-पालकही दिसत नव्हते. त्यामुळे मोहम्मद अली रोड शांत शांत होता.

आपली प्रतिक्रिया द्या