मराठा समाजाची फसवणूक झाली!


सामना ऑनलाईन, मुंबई

राज्य सरकारने जाहीर केलेली मेगा भरती रद्द करावी यासाठी मराठा तरुणांनी राज्यभर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील असे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले, मात्र या आश्वासनानंतर महिना उलटला तरी मुख्यमंत्र्यांकडून मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार पोलिसांना करण्यात आला नाही. राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक सुरू असल्याची व्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक भगव्या टोप्या घालून उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी आले. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर नसल्याची बाब उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने जनआंदोलन पुकारण्यात आले. यादरम्यान छोटय़ा-मोठय़ा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अद्यापही विद्यार्थी, युवक, महिला व समन्वयकांची धरपकड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महिना उलटला तरी मराठा समाजाच्या लोकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत.  याविषयीचे निवेदन उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे, संजय सावंत, संतोष काळे-पाटील, अमित घाडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

एकाही आश्वासनाची पूर्तता नाही

आंदोलनादरम्यान आत्महत्या करणाऱया तरुणांच्या कुटुंबीयासाठी मदत जाहीर केली. कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत घेतो म्हणून सांगितले. कोपर्डीतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली, मात्र खटला उच्च न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहे. सरकारकडून एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचे या समन्वयकांनी उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास  आणले.