मराठा तरुणांवर कायद्यानं आणलेलं खोटं विघ्न दूर करा, उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं

uddhav thackeray

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठा समाजाला दिलेलं आश्वासन पूर्ण न करता रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर आणि माता-भगिनींवर सणासुदीच्या काळात सरकार कायद्याचं खोटं विघ्न आणत आहेत त्यातून त्यांची सुटका करा, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला ठणकावलं आहे. मराठा मोर्चाच्या समन्वय समितीने आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी मराठा मोर्चाच्या मागण्या, मोर्चाची सद्य स्थिती, मराठा तरुणांचे प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले. त्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांवर चुकीच्या पद्धतीने लादलेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा शिवसेना संघर्षासाठी उतरेल, अशा आक्रमक शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. वातावरण बिघडायच्या आत, परिस्थिती वाईट व्हायच्या आधी त्यांना न्याय द्या, असं त्यांनी सरकारला सुनावलं.

मराठा समाजाने आपल्या न्याय मागण्यांसाठी आगदोर शांततेत मोर्चे काढले. पण सरकारने त्यावेळी दुर्लक्ष केलं. त्यामुळेच संतापलेला मराठा समाजातील तरुण आणि माता-भगिनी या रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी ठोक मोर्चे काढले. पण काही समाजकंटक यामध्ये घुसले आणि त्यांनी तोडफोड केली आणि निरपराध मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र ते पाळलं गेलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या शिवरायांचा मावळा असं काम करू शकत नाही, त्यामुळे ज्यांच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत त्यांच्यावर कारवाई करा मात्र निरपराध तरुणांवरील आणि माता-भगिनींवरील गुन्हे तातडीने मागे घ्या, असं त्यांनी सरकारला बजावलं.

विधानसभेचे अधिवेशन कधी भरावणार

मराठा समाजासह अन्य समाजही आपल्या न्याय मागण्या सरकारकडे करत आहेत. तेव्हा या सर्व समाजांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन भरवण्याची मागणी शिवसेना पहिल्यापासून करत आहे. मात्र हे विधानसभेचे अधिवेशन कधी भरवणार, असा खणखणीत सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

-जे अटक सत्र सुरू आहे त्यात निरपराध मावळ्यांची धरपकड सुरू आहे

– गुन्हे मागे घेण्याबाबत जे सांगितलेले होते त्याचे कोणतेही आदेश पोलिसांना देण्यात आले नाही

-पोलिसांकडे काही पुरावे असतील तर जरूर अटक करा

– ताबडतोब गुन्हे मागे घ्या, सणासुदीच्या काळात यांच्यावर कायद्याचे खोटं विघ्न आणत आहे ते दूर करा

– अनेक समाज आहे त्यांच्या न्यायाबाबत विधानसभेचे अधिवेशन कधी भरावणार

– लवकरच हे अधिवेशन भरवून त्यांचा प्रश्न सोडवावा

– चालढकल करून या समाजाला फसवू नका

– हिंसाचाराबाबत ज्यांच्याबाबत पुरावे नाही त्यांना अटक करू नका

– न्यायासाठी शिवसेना या समाजसोबत राहील

कोपर्डी

– फास्ट ट्रेक कोर्ट मध्ये ही हे प्रकरण अडकलंय

– उज्ज्वल निकम यांनी नेमणूक व्हावी

– आरोपींना फाशी झालीच पाहिजे

– सरकारने दिलेली आश्वासन अजून पाळली नाहीत

– कायद्याच्या चुकीचा वरवंटा त्यांच्या घरावर फिरतोय

– वातावरण बिघडायच्या आत, परिस्थिती वाईट व्हायच्या आधी त्यांना न्याय द्या

-मुख्यमंत्री, आपण दिलेल्या शब्दच या भूलथापा ठरू नयेत

– जातीपातीबाबत न्याय मिळवण्याची वेळ आज आली हे दुर्दैव

एक प्रतिक्रिया

  1. ज्या आंदोलनामध्ये शिवरायांचे मावळे शांततापूर्ण आंदोलन करीत होते त्या आंदोलनात जर समाज कंटक घुसले आहेत आणि ते विघातक कृत्ये करत आहेत तर शिवरायांच्या त्या मावळ्यांचे प्रथम कर्तव्य होते की समाज कंटकाना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणे.असे घडले नसेल तर ते शिवरायांचे मावळे म्हणायला नालायक आहेत.