सामना प्रतिनिधी । मुंबई

ज्यांच्याविरोधात पुरावे नाहीत त्या माझ्या मराठा तरुणांना, माताभगिनींना छळू नका. सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. विघ्नहर्त्याचे आगमन होताना यांच्यावर कायद्याचे खोटे विघ्न आणताय ते आधी दूर करा. शिवसेना तुमच्या सोबत आहे.
– उद्धव ठाकरे

मराठा समाज न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरलाय. न्याय्य हक्क बाजूलाच राहिला, पण कायद्याचा चुकीचा वरवंटा त्यांच्या घरादारावर फिरवला जातोय. तो वरवंटा थांबला नाही तर शिवसेना या तरुणांसोबत रस्त्यावर उतरेल. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून हे गुन्हे मागे घ्यायचे आदेश तत्काळ महाराष्ट्र पोलीस ठाण्यांना द्यावेत. ज्या तरुणांची, माताभगिनींची धरपकड विनाकारण झाली असेल त्यांची ताबडतोब सुटका करा, असा इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आज उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतरही मागे घेण्यात आले नसल्याची बाब त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा तरुणांनी आपल्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी शांततेने लाखालाखाचे मोर्चे काढले. या शांततेच्या आंदोलनाकडे सरकारने फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यांच्या व्यथा गांभीर्याने कोणी घेतल्या नसल्यामुळे दुर्दैवाने या समाजाला रस्त्यावर उतरावे लागले. न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी त्यांच्या आडून समाजकंटकांनी हिंसाचार घडवून आणला आणि त्याचे खापर यांच्या डोक्यावर फोडण्यात आले आहे.

शिवरायांचा मावळा महाराष्ट्र जाळतोय हे होऊच शकत नाही

आंदोलनात जसा हिंसाचार वाढला तसे मराठा समाजाने आंदोलन शांत केले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की गुन्हे मागे घेऊ, पण गुन्हे मागे घेण्याचे आदेश अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्याला देण्यात आलेले नाहीत. एवढेच नाही ज्यांचा हिंसाचाराशी संबंध नाही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, त्यांना अटक करण्यात येत आहे.
ज्यांच्याबद्दल सीसीटीव्ही फुटेज असेल त्यांच्याविरोधात पुरावे असतील तर जरूर अटक करा. कारण हिंसाचार आम्हाला मान्य नाही. त्यांना अटक करण्यास मराठा समाज मदत करेल. पण शिवरायांच्या मावळा मराठा समाज महाराष्ट्र जाळतोय हे होऊच शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

कोपर्डीतील गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी सरकारने त्वरित हालचाली कराव्यात

कोपर्डीतील गुन्हेगारांना खालच्या कोर्टात सजा झाली. त्यानंतर ते अपिलात गेले. फास्ट ट्रक कोर्टाचा अर्थ काय… एका कोर्टातून दुसऱया कोर्टात गेल्यानंतर जलदगतीने न्यायनिवाडा व्हायला हवा. ज्यांनी ही लढाई खालच्या कोर्टात लढली त्या ऍड. उज्ज्वल निकम यांचीच नेमणूक पुढील सुनावणीसाठीही व्हावी अशी सर्वांची मागणी आहे. त्या नेमणुकीबद्दल निर्णय घ्यायला हवा. ती नेमणूक लवकर व्हायला हवी. जे आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे. त्यासाठी सरकारने त्वरित हालचाली कराव्यात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विघ्नहर्त्याचे आगमन होताना खोटे विघ्न दूर करा

मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय तुम्ही गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले, तेव्हा ते गुन्हे मागे घ्या. ज्यांच्याविरोधात पुरावे असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. कायद्याने जी काही सजा असेल ती त्यांना होईलच. ज्यांच्याविरोधात पुरावे नाहीत त्या माझ्या मराठा तरुणांना, माताभगिनींना छळू नका. सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. विघ्नहर्त्याचे आगमन होताना यांच्यावर कायद्याचे खोटे विघ्न आणताय ते आधी दूर करा. शिवसेना तुमच्या सोबत आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले.

आरक्षणाबाबत ढकलगाडी करून समाजाची फसवणूक करू नका

आरक्षणाबाबत जी चालढकल चाललीय त्याला कालमर्यादा आहे असे वाटत नाही. याआधीही शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा, धनगर, महादेव कोळी असे अनेक समाज आहेत त्यांना आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा. सर्व पक्षांनी एकमुखाने ठराव मंजूर करून संसदेत पाठवावा. अन्य राज्यांचेही प्रस्ताव येऊ देत. या सर्वांचा विषय लवकरात लवकर सोडवावा. जसे अन्य विषय सोडवता तसा हा विषय सोडवावा. ढकलगाडी करून समाजाची फसवणूक करू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.