मराठा आंदोलक मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम उधळून लावण्याची शक्यता, ५०हून अधिक ताब्यात

फाईल फोटो

सामना ऑनलाईन । पिंपरी

क्रांतीवीर दामोदर हरी चाफेकर संग्रहालयाच्या इमारतीचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिंचवड येथे होणार आहे. हा कार्यक्रम निर्विघ्न पार पाडवा यासाठी म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच ५० हून अधिक मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं. मात्र यामुळे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा आणि राज्यात होणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती अशा मागण्यांवर आंदोलक ठाम आहेत. मात्र सरकार या मागण्यांसदर्भात केवळ आश्वासन देते पुढे कोणतीही कारवाई करत नाही यामुळे मराठा समाजात रोष आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांनी आता आंदोलन तीव्र करत सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. राज्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे न जाता पूजा देखील घरच्याघरी केली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड येथे क्रांतीवीर चाफेकर संग्रहालयाच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती आंदोलकांना मिळाल्यानं त्यांनी आपला मोर्चा पिंपरी-चिचवडकडे वळवला आहे. आंदोलकांनी क्रार्यक्रम स्थळाच्या परिसरात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाजाला आरक्षण द्या, मेगा भरतीला स्थगिती द्या, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यामुळे वातावरणात तणाव वाढला आणि आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यावेळी ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतल्याचं कळतं आहे.