मराठा आरक्षण… शहांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला देणे गरजेचे होते, पवारांच्या कानपिचक्या

सामना प्रतिनिधी । अलिबाग

भाजप अध्यक्ष अमित शहा तेलंगणातील प्रचारसभेत 50 टक्क्यांवर आरक्षण देता येत नसल्याचे बोलतात, मात्र असे असताना महाराष्ट्रात 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात आले. मग या संदर्भात अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देणे गरजेचे होते, अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत. अलिबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तरे देताना त्यांनी भाजपला टोले हाणले.

राज्य सरकाराने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. पण धनगर आणि मुस्लिम समाजाला ही आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी देखील त्यांनी सरकारकडे यावेळी केली.

देश पातळीवर ठोस पर्याय देण्याची कुठल्याच पक्षाची ताकद नाही यामुळे भाजप विरोधी पक्षांच्या स्थानिक पातळ्यांवर आघाड्या व्हाव्यात. निवडणुकीनंतर देशपातळीवर आघाडी व्हावी, अशी इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राममंदिराच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, निवडणूक आली की राममंदिराचा मुद्दा समोर येतो.

केंद्रीय पथकाकडून राज्यातील दुष्काळी भागात दौरा सुरू करण्यात आला आहे. याबद्दल बोलताना त्यांनी दुष्काळ दौऱ्याच्या निर्णयाचे स्वागत केले. पण शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

मोदी सरकारच्या कालखंडात न्यायव्यवस्था, संसद, रिझर्व्ह बँक, सीबीआय यामध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढतोय असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

देशाच्या इतिहासात सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नव्हती, ती या सरकारच्या काळात आली. आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्रे आहेत तेच जनतेचे हित सांभाळणाऱ्या संस्थांवर हल्ला जात आहे ही चिंतेची बाब असल्याचेही ते यावेळी म्हणाले.