स्मार्ट… हॉट… डॅशिंग!!

11

अदिती सारंगधर,[email protected]

निवेदिता आणि अशोक सराफ अर्थात अशोक मामांचा नातू सनी… दुधाळ रंगाचा, टपोऱया डोळ्यांचा… मराठी इंग्रजी, फ्रेंच या भाषा त्याला अवगत आहेत…

गुगल मॅपने लोकेशन आल्याचं दाखवलं. घाईत लिफ्टपाशी गेलो आणि वर जाऊन दारावरची बेल दाबली. आतून भू भू वगैरे काहीच आवाज नाही. आपण आधीच खूप लेट, त्यातून घर चुकलोय असं वाटून मी पुन्हा लिफ्टपाशी आले. इतक्यात दरवाजा उघडला. स्मीत हास्य करत एका मुलीने बसा म्हटले. घरात पाऊल ठेवलं तरी धावून उडय़ा मारणारा तो आलाच नाही. घर तर बरोबर होतं. भिंतीवर त्याच्याबरोबर लावलेली फोटोग्राफी त्याच्या चित्राचा आणि नावाचा एक मोठा कॉफीचा मग भिंतीला नुसतीच लावून ठेवलेली एक साखळी- लिश… त्याच्या खानपानाचा सामान, त्याचे डबे, त्याच्या छोटय़ा छोटय़ा प्रतिकृती… सगळं दिसत होतं. पण रावजी आहेत कुठे ते कळत नव्हतं. त्या स्मीत हास्य मुलीने हातात पाण्याचा ग्लास ठेवला आणि एका बेडरूममधून दरवाजा उघडून तो धावत अंगावर आला. दुधाळ रंगाचा, स्मार्ट हॉट, टकाटक दिसणारा सनी… सूर्यासारखाच एकदम ब्राईट.

आला तसा त्याच्या उडय़ा थांबेचना. बहुतेक मी आवडले होते त्याला. सो त्याचा एक बॉल घेऊन आला आणि मला खुणवायला लागला. जशी मी तो बॉल घ्यायला त्याच्या मागे पळाले तसा मला हुलकावण्या देत तो टेबलाच्या त्या बाजूला पकडापकडीचा हा डाव पाच मिनिटे तरी चालला. शेवटी दमून मी सोफ्यावर बसले. तो जवळ आला तशी जरा दुर्लक्षच केलं. तर साहेबाने दोन पाय मांडीवर ठेवले आणि जणू चल ना गं प्लीज खेळायला माझ्याशी… असं सांगितलं. बोलके डोळे, अतिप्रेमळ स्वभाव आणि कमालीचा इनोसन्स मला पराकोटीचा दिसला. एक पप्पी घेतली आणि तितक्यात निवेदिता ताई बाहेर आली. ‘बरं झालं गं बाई, तुला उशीर झाला. त्याला अंघोळ घालता घालता वेळ एक तासाच्या वर गेला.’

अगं कशी आहेस तू…पासून सोफ्यावर गप्पा सुरू झाल्या आणि सनी ओहो, माझ्याविषयी आहे तर… आमच्या गप्पा जाणून समोर टेबलाखाली येऊन बसला. सनी खरं तर अनिकेत सराफचा मुलगा… पर्यायाने अशोक सराफ (आमचे अशोकमामा) आणि निवेदिता ताई त्याच्या आजी. त्यामुळे या वेगळ्या नात्याची वेगळी गुंफण ऐकायला मलाही मज्जा येणार होती.

खरं तर लहानपणापासून मला डॉग हवा होता. लग्नानंतरही… पण अशोकना वाटायचं ती एक मोठी जबाबदारी आहे. आणि पूर्णतः आपण ती पार पडू शकलो नाही तर… मुक्या जिवाचे हाल… सो नकोच! पण अनिकेत (माझा मुलगा) लहान असताना नेहमी म्हणायचा ‘मम्मा, मला डॉग तरी आणून दे किंवा सिबलिंग तरी…’ इतके त्याला डॉग आवडायचे आणि मला ब्लॅकमेल करणं… पण इतकी जबाबदारी सतत घेणं जमेल असं मलाही वाटत नव्हतं. अनेक वर्षे गेली त्यात…

कालांतराने माझी आई गेली आणि मी तिच्याशी अत्यंत क्लोज होते. त्यामुळे मी सतत खूप नाराज असायचे. मूड नसायचा. डिप्रेस असायचे. त्यावेळी कामही करावंसं वाटत नव्हतं बिल्कुल. त्यावेळी अनिकेतने ठरवलं की, आता हिच्यासाठी कुत्रा आणायचाच… अर्थात यातलं काहीही मला माहीत नव्हतं.

पुण्यात माझा ‘वाडा चिरेबंदी’चा प्रयोग होता. साडेबाराला तो संपवून निघाले तर रस्ताभर अनिकेतचे कुठे पोचलीस, असे फोन… मला थोडं टेंशन आलं होतं खरं तर… कुणाला काही झालंय का? घरी पोहोचले तर घर अनिकेतच्या मित्रांनी भरलं होतं. पहाटे चार वाजता आणि एक मित्र काहीतरी व्हिडीओ शूट करत होता. डोळे बंद करून त्यांनी मला एका खुर्चीवर बसवलं. हे जेमतेम दोन मिनिटांचं, गोंडस, इवलंसं पिल्लू हातावर ठेवलं. इतका इतका आनंद झाला… आणि भीतीही! ‘अशोक कधीच त्याला इथे राहू देणार नाही’ पण आता इतकं बदललंय की अशोकचं त्याच्याशिवाय आणि त्याचं अशोकशिवाय पान हलत नाही.

डॉक्टरांनी कॉल करून सांगितलं अनिकेतला की पिल्लू आलंय. पण जन्मापासून त्याच्या उजव्या पायात डिफेक्ट होता. खूप स्कीन ऍलर्जीज होत्या. बाकी बाळ उत्तम होतं. अनिकेतने विचार केला आपल्या खऱया मुलात असा डिफेक्ट असता तर त्याला हॉस्पिटलमध्येच आपण ठेवून येऊ का…? आणि आणलं गं उचलून… बरं चिडलेल्या अशोकला सांगितलं, त्याला जरा हेल्दी बनवूया. पूर्ण बरं करूया. चांगलं घर शोधूया आणि पाठवून देऊया.

फायनली ऑफिशियली तो सनशाईन अनिकेत सराफ झाला. पर्यायाने निवेदिता आंटी आणि अशोक आजोबा झाला. सनी घरी आल्यावर त्याच्या हेल्थकडे लक्ष द्यायला सहा महिने घरी होता. पपी क्लासमध्ये त्याला घेऊन जायचा. सनीला लागलेल्या सगळ्या चांगल्या सवयी आणि शिस्त फक्त अनिकेतमुळे आणि आम्ही त्या शिस्तीला मोडता घालायचा प्रयत्न केला तर आम्हाला तडी मिळते. तरी कधी कधी अतिप्रेमात मी चिटिंग करतेच.

सन्यूडी, मन्यूडी, गुंडुडीची झोप झाली होती. पुन्हा बॉल माझ्या मांडीवर ठेवून मला खेळायला बोलवत होता. इतक्यात बेल वाजली. आमचा फोटोग्राफर आला आणि दारातच उभा. घाबरला तो सनीला. धीर करून आत आला आणि सनीने त्याला असं काही घोळात घेतलं की आमचेही फोटो काढायचेत हे विसरलाच तो… मस्तपैकी पप्पी देऊन गेला सनीला. बघितलं, असं वेडं करतो सनी येणाऱया प्रत्येकाला… लहान, घाबरणारी मुलं, मोठी माणसं यांना आपल्या प्रेमात कसं पाडायचं याचं टेक्निक तो वरून शिकून आलाय. सनी काही थांबेचना.. नुसती मस्ती करायची होती त्याला. सनी बनाना कुठे आहे? म्हणताच सगळं सोडून डायनिंग टेबलकडे जाऊन उभा राहिला. अगदी लहान मुलाला भरवतात तसं रानूडी आता तुझा पप्पा मला ओरडणार आहे हां… अती लाड करतेय तुझे. पण आज गुड बॉयसारखी माझ्याकडून अंघोळ घालून घेतलीस ना. सो तुला हे केळं गिफ्ट…

तू बघशील ना, तर घरातलं हे सगळं फर्निचर रिनोव्हेट करताना सनी फ्रेंडली करून घेतलं. टेबलाखाली जाऊन बसता यावं म्हणून तशी टेबलं टीपॉय केले. फ्रेंच विंडो न करता असा कडप्पा केला जेणेकरून तो खिडकीत बसू शकेल. वूडन फ्लोरिंग केलं तर… असं दाखवत दाखवत त्या सनीच्या बेडरूमपाशी घेऊन गेल्या. एक अख्खा बेड दिसताच टूणकन उडी मारून बसला त्याच्यावर… रात्री एसी लावून सनी रोज या बेडवर झोपतो. त्यादिवशी एसी लावायला विसरले आणि मी झोपायला गेले. हा भुंकतोय, भुंकतोय… पाणी होतं, जेवण, सुसू, शिशी… सगळं झालं होतं. काही दुखतंय का बघितलं. तसं जाणवलं नाही. पण हा भुंकतोच आहे. शेवटी माझी मेड म्हणाली ताई एसी हवाय बहुतेक… जसा एसी लावला तसा तू कोण आणि मी कोण… शेठ आडवा झाला आणि गार झाला.

इतकं बोलता बोलता गरमागरम हेल्दी पास्ता इन व्हाईट सॉस, घरी बनवलेला यम्मी ब्रेड आला. समोर बटर… आहा हा… मेरा दिन बन गया… आणि हे सगळं करणारी सुपर शेफ निवेदिता आजी होती. सनीबद्दल बोलता बोलता प्रत्येक शब्दात प्रत्येक एक्सप्रेशनमध्ये खूपच प्रेम, काळजी, आनंद या पलीकडचं सगळं जाणवत होतं.

एवढय़ात सनी आमच्या बाजूने काहीतरी घेऊन पळाला. बरं दोघी त्याच्या मागे त्याला पकडायला… कारण काहीतरी तोंडात टाकलं होतं नक्की. बऱयाच झटापटीनंतर निवेदिता ताईने त्याचं तोंड उघडलं तर टिश्यू पेपरचा गोळा. ‘आता हे खायला कुणाला आवडतं का?’ हं… कुणी खाल्ला टिश्यू… घाणेरडा मुलगा आहेस काय? सनी बॅड बॉय आहे. पंजा गालावर ठेवून सनी सॉरी म्हणाला. हाऊ क्यूट. सॉरी, थँक्यू, प्लीज हे सगळं शिकवलंय त्याला. मराठी, इंग्रजी आणि फ्रेंच समजतं हं आम्हाला. दोन पुढच्या पायांना खेचून टेबलाखाली दडून बसलेल्या सनीला बाहेर खेचलं आणि त्याला नको असलं तर आमचं लाड करणं सुरू झालं. कानामागे खाजवणं, डोक्याला मसाज, अंगाला मसाज… आज तर सनी राजे ओव्हर ओव्हर पॅम्परिंग झोनमध्ये होते. कारण हे सगळं दोन दोन वेळा मिळत होतं. निवेदिता ताई आणि मी…

एका टेस्टसाठी त्याला डॉक्टरकडे नेलं तर तिकडे एक डॉग अक्षरशः मरणाच्या दारात होता. तिचे पॅरेंट खूपच काळजीत होते. डॉक्टरांनी अनिकेतला विचारून तुम्ही सनीचे ब्लड डोनेट करायला तयार आहात का? विचारलं. अनिकेतने ऑफकोर्स हो म्हटलं. सुदैवाने सनीचं ब्लड मिनीला मॅच झालं. ब्लड ट्रान्सफर झालं आणि मिनी वाचली. इतका मोठा आनंद झाला. पण जर मिनी वेळेत त्या ब्लड ग्रुपचं रक्त मिळालं नसतं तर… त्यामुळे तेव्हापासून नेहमी वाटतं की, चांगल्या सुसज्ज ऍडव्हान्स ब्लड बँक हव्यात डॉगसाठी… आपले कसे ब्लड डोनेशन कॅम्प असतात तसे त्यांचेही हवेत. म्हणजे कुठलीच मिनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबणार नाही.

सनी एवढय़ात खाली फिरून आला होता. आल्यावर दारातच अँटीसेप्टिकनी त्याचे चारही पाय पुसले, शेपटी स्वच्छ झाली,  तोंड साफ केलं, अंगावरून ब्रश फिरला आणि मग राजबिंडा पुन्हा घरात आला… सुसज्ज यंत्रणा (म्हणजे त्याचा बॉल, खेळणी) घेऊन माझ्यासमोर की, ‘बाबा बास करा हं आता तुमची गप्पाष्टकं आता गुमान माझ्याशी खेळायचं.’ जमणार होतं का त्याला नाही म्हणणं. आमची धरपकड पुन्हा सुरू ती संपता संपत नव्हती. पण आज खूप खूप दिवसांनी एक सुखी कुटुंब भेटलं. खूप खूप आपलं वाटणारं आणि क्षणात आपलसं करून घेणारं. थँक यू निवेदिता ताई आणि सनीला खूप खूप पप्प्या!!!