ऊस गोड लागला म्हणून…

559
 • वैष्णवी कानविंदे – पिंगे

सं बऱ्याचदा होतं बघा, शोकेसमध्ये लावलेला एखादा रंगीबेरंगी पोशाख बघून आपण भाळतो. आपल्याला तो नक्कीच छान दिसणार अशा विश्वासाने आपण तो विकत घेतो, पण विकत घेऊन अंगात घातल्यावर लक्षात येतं की, हे जे काही होतं ते फक्त शोकेसमध्येच शोभून दिसत होतं. प्रत्यक्षात मात्र तो भ्रमनिरासच आहे. त्याचा रंग फारसा पक्का नाही आणि फिटिंग तर इतकं ढगळ की, कुठून कुठून शिलाई घालायचा प्रयत्न केला तरी तो बसूच शकत नाही आणि झगमगाटात तो जितका झगझगीत दिसत असतो तितकाच प्रत्यक्षात आपल्याला आवडतच नाही.

होतं की नाही असं? अगदी तसंच्या तसं नुकताच प्रदर्शित झालेला ‘भेटली तू पुन्हा’ हा सिनेमा पाहताना होतं.
या सिनेमात नवीन काही नाही. शंभर डझन हिंदी सिनेमे जी प्रेमकथांची शिदोरी घेऊन वावरतात तीच शिदोरी या सिनेमांनी बांधली आहे. दृष्यं लिहिताना किंवा चित्रित करतानाही हा बॉलीवूड इफेक्ट पदोपदी दिसतो. आता वेगळं काही नसलं तरी जर मांडणी आकर्षक असली तरी त्याच त्याच प्रेमकथा आवडूनही जातात, पण यात तसंही नाही. अर्ध्या मिनिटाचा जीव असणाऱ्या अनेक दृष्यांना एवढं जास्त खेचलंय, एवढं खेचलंय की, ‘‘अरे देवा, कधी संपणार हा खटाटोप!’’ असं वाटल्यावाचून राहवत नाही.

या सिनेमाची कथा म्हणजे एक हीरो. अर्थात मराठमोळा. लग्नासाठी सुयोग्य स्थळ. तेही पुणेरी. त्यामुळे त्याच्यासाठी स्थळं येतात. त्याच्या आईवडिलांना सुनेच्या असंख्य अपेक्षाही असतात आणि त्याचे बघण्याचे कार्यक्रम सुरू होतात. जवळ जवळ तीन डझन मुली बघून झाल्यावरही त्याला एकही क्लिक होत नाही आणि शेवटी तो या कार्यक्रमांना कंटाळतो. अशातच आणखी एक कार्यक्रम होतो. पुण्यातल्या वाडय़ात राहणाऱ्या एका भरगच्च कुटुंबातली आणखी एक चारचौघींसारखी मुलगी समोर येते आणि आपला हा हीरो तिलाही नकारच देतो. मग काही महिन्यांनी त्या दोघांची योगायोगाने ट्रेनच्या प्रवासात भेट होते आणि तिथे त्याला त्या टिपिकल मुलीची नव्याने ओळख होते आणि कांदापोह्याच्या कार्यक्रमातली आणि प्रत्यक्ष आयुष्य जगणारी मुलगी यातला फरक तो अनुभवतो आणि नव्याने प्रेमात पडतो. आता या मुलीला आपण होकार द्यावा असंही त्याला मनोमन वाटू लागतं, पण… इथे एक पण येतो आणि आपण जे ठरवून चालतो तसं कधी घडत नाही याचा प्रत्यय येतो. असं काय घडतं नेमकं? सरळसाधी वाटणारी ही प्रेमकथा कुठचे ट्विस्ट आणि टर्न्स घेते आणि तो गुंता सुटतो तरी कसा अशी ही कथा.

खरं सांगायचं तर या कथेत दिग्दर्शकाने फिरकी फिरवली असली तरीही ती कथा अगदी सरळ, धोपट मार्गानेच चालत राहते. इतकी जास्त नाकासमोर चालते आणि त्यात ती इतकी रेंगाळते की, शेवटी भयंकर कंटाळा यायला लागतो.

हा सिनेमा सुरू होतो तेव्हा त्याचा प्रथमदर्शी चेहरा बरा वाटतो. आजकाल मराठीतला हवाहवासा ताजा, टवटवीतपणा त्यात दिसायला लागतो आणि आणखी एक छान सिनेमा पाहायला मिळणार असं वाटायला लागतं, पण त्या पहिल्या पाच मिनिटांनंतर मात्र सिनेमा विशेष काही रंग दाखवतच नाही.

या सिनेमातली बरी बाजू म्हणायची तर ती आहे कलाकारांची निवड. सुरुवातीला चारचौघींसारखी वाटेल अशी, पण नंतर तिच्यातलं वेगळेपण ठळकपणे दिसू शकतं अशी अभिनेत्री पूजा सावंत आणि टॉल डार्क हँडसम, कोणतंही मराठमोळं स्थळ म्हणून मुलींना आवडू शकेल असा वैभव तत्त्ववादी ही जोडी झक्कास आहे. ही नवीन जोडी असल्याने ती भावूनदेखील जाते आणि दोघांनी वाट्याला आलेलं बेअरिंग बऱ्यापैकी निभावलंय, पण लेखन, दिग्दर्शनातून त्यांना जे खूप जास्त फिल्मी करण्यात आलंय त्यामुळे त्या कलाकारांचा प्रभाव खूपच दुबळा होऊन जातो. बाकीचे कलाकार अगदी जेवढ्यास तेवढे आहेत. हे दोघेच महत्त्वाचे आहेत त्यामुळेच ते जर सहज असते तर सिनेमाही खूप सहज वाटला असता, पण दुर्दैवाने तसं झालं नाही.

आता ट्रेनचा प्रवास दाखवलाय आणि आयुष्य जगताना घेण्याचा जो आनंद दाखवलाय तो इतका खेचलाय की, काही विचारता सोय नाही. ती बबली आहे, बडबडी आहे, पण अरे देवा, ही काय! अशी असं वाटायची प्रेक्षकावर वेळ येते तेव्हा ते जरा जास्तीच होतं, नाही! तीच गोष्ट हीरोची. तो बरा वाटतो, पण नंतर प्रत्येक गोष्ट अति व्हायला लागते तेव्हा फिल्मी वाटायला लागतो. या सिनेमात दृष्यातून गंमत आणण्यापेक्षा हा सिनेमा बोलण्यातून जास्त व्यक्त झालाय. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं थोड्य़ा थोड्य़ा वेळाने स्पष्टीकरण सुरू होतं आणि ते फारच परत परत होतंय असं वाटायला लागतं.

या सिनेमाची गाणी चांगली आहेत, पण ती खूप जास्त आहेत. जेव्हा सिनेमा आता कधी संपतोय असं वाटत असतं तेव्हाच ती वाट्य़ाला येतात आणि त्यामुळे त्या गाण्यांचा आनंद हवा तसा घेता येत नाही आणि दृष्यांच्या पार्श्वभूमीवर असलेलं पार्श्वसंगीत खूप भडक झालंय. ते खरं तर दृष्यांचं सौंदर्य अधोरेखित करणारं असायला हवं, पण त्याऐवजी बऱ्याचशा दृष्यांमध्ये ते अडसर ठरतं आणि तेच जास्त कानावर येतं. अर्थात सिनेमाचं नमूद करावं असं सौंदर्यस्थळ म्हणजे छायांकन. त्यामुळे सिनेमाला छान उठाव आलाय. पण संवाद किंवा अभिनेत्रीला उगाचच दिलेलं बेअरिंग अनावश्यक होतं असं राहून राहून वाटत राहतं. मध्यांतरापर्यंत तो प्रवास आणि तो कुठच्या दिशेने जाणार हे ठाऊक असल्याने कंटाळवाणा होतो.

हा सिनेमा पाहताना दिग्दर्शकावर करण जोहर, रोहित शेट्टी, फराह खान, सूरज बडजात्या, यश चोप्रा अशा सगळ्या मंडळींचे चमचा चमचाभर प्रभाव आहेत हे सिनेमाभर जाणवत राहतं. प्रत्येक दृष्य पाहताना शाहरुख, काजोल वगैरे मंडळींचे निरनिराळे सिनेमे कुठून कुठून दिसत राहतात. अर्थात यात वाईट असं काही नाही. सिनेमाने तीच जातकुळी अनुसरायची ठरवली असेल तर तेदेखील छान वाटू शकतं, पण ती भट्टी जमून आली नाही हेच खरं.

एकूणच सिनेमाचं एखादं दृष्य बरं जमलं म्हणून खेच खेच खेचलं आणि खेचून खेचून फाटलं अशी गत झाली आहे. या सिनेमाचा विषय म्हणजे कांदेपोहे कार्यक्रम मराठी जनांसाठी खूपच प्रसिद्ध आहे. अशा विषयावर हल्लीच्या हल्ली आलेले सिनेमे प्रेक्षकांची कौतुकाची थापही मिळवून गेले आहेत. हा सिनेमाही त्याच पठडीत आणखी एक बरा सिनेमा होऊ शकला असता. कलाकार इतके छान आणि फ्रेश असताना सिनेमाचा फिल्मी बाजही सहज आवडून गेला असता, पण दुर्दैवाने तो अति चघळल्याने त्याचा चोथा झालाय. एकूणच काय, ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खायचा नसतो हेच खरं.

 • दर्जा : **
 • सिनेमा : भेटली तू पुन्हा
 • निर्मिती : अथर्व फॉर यू रिक्रिएशन अॅंड मीडिया प्रा. लि.
 • कथा-पटकथा – संवाद : संजय जमखंडी
 • दिग्दर्शन : चंद्रकांत कणसे
 • कॅमेरा : प्रदीप खानविलकर
 • गीते : मंगेश कांगणे
 • संगीत : चिनार महेश
 • गायक : स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, निखिल मोदगी, सिद्धार्थ महादेवन.
 • कलाकार : वैभव तत्त्ववादी, पूजा सावंत, गिरीश ओक, किशोरी अंबिये, अभिजीत चव्हाण, मीनल बाळ, गणेश हजारे, विश्वास सोहनी, भारत सावळे.
आपली प्रतिक्रिया द्या