उद्यापासून अस्सल नाटकांचा सोहळा

सामना प्रतिनिधी, मुंबई

नाटयरसिकांना पृथ्वी थिएटरकडून मराठी-हिंदी नाटकांची मेजवानी मिळणार आहे. नाटक, संगीत, काव्य अशा विविध कलांची मेजवानी घेऊन येणारा पृथ्वी थिएटरचा नाट्य महोत्सव उद्यापासून १३ नोव्हेंबरपर्यंत साजरा होतोय. या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा मराठी नाटकं सादर होणार असून मकरंद देशपांडे दिग्दर्शित ‘स्पॉट ऑन’ या नाटकाचा शुभारंभ या वेळी होणार आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये हे नाटक सादर केलं जाणार आहे. बालगंधर्वांनी अजरामर केलेलं ‘संगीत मानापमान’ या मराठी संगीत नाटकाचा आनंदही रसिकांना या महोत्सवादरम्यान घेता येईल.

पृथ्वी हाऊसमध्ये सादर होणारी छोटी-छोटी नाटकं, अंगणातही सादर होणारी पथनाट्य, संगीताचे कार्यक्रम, काही कार्यक्रम विनामूल्य तर काही तिकीट शो… इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती असे विविध भाषिक प्रेक्षक, काही दहा मिनिटांची, तर काही तासाभराची नाटके… नाटक, नृत्य, संगीत अशा अनेक कलांची चंगळ प्रेक्षकांना या वेळी अनुभवायला मिळणार आहे.

पृथ्वीचा महोत्सव खूप खास, वैशिष्ट्यपूर्ण असतो. मी या वेळी पहिल्यांदाच पृथ्वी थिएटरतर्फे काम करतेय. त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आहे. माझी पृथ्वीतर्फे काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे आमच्या नाटकापासूनच इतर नाटके सादर होणार आहेत, याचा मला खूप आनंद होतोय, असं महोत्सवा वेळी ‘स्पॉट ऑन’ या नाटकात काम करणाऱ्या अभिनेत्री समिधा गुरू सांगतात.

‘स्पॉट ऑन’ हे नाटक सुरुवातीला मराठीतच लिहिलं गेलं होतं. त्यानंतर ते या महोत्सवादरम्यान सर्वच प्रेक्षकांना पाहता यावं याकरिता हिंदी भाषेतही सादर होणार आहे. मकरंद देशपांडे यांच्या पत्नीची व्यक्तिरेखा मी यामध्ये साकारत आहे. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार त्यामुळे त्यांच्यावर ओढवलेली वेळ. याकडे कोणीही लक्ष देत नाही. अशा व्यक्तीचे त्रास दिसतात, त्यांच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत, मात्र अशा व्यक्तीचं संवेदनशील मन या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वेळी त्यांची पत्नी कशा प्रकारे तोंड देते, हे आजच्या प्रेक्षकांपुढे उलगडवून सांगणारं ‘स्पॉट ऑन’ हे नाटकही प्रेक्षकांना पाहता येईल.

सादर होणारी नाटके
महोत्सवादरम्यान ४ नोव्हेंबर रोजी ‘तिच्या आईची गोष्ट, अर्थ माझ्या आठवणींचा’, ५ नोव्हेंबरला आशा थिएटर ग्रुपतर्फे आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करणारं ‘स्पॉट ऑन’, ७ तारखेला ‘मुंबईत बॅकस्टेजवाला कोणी’, ९ नोव्हेंबर रोजी मराठी संगीत नाटक ‘संगीत मानापमान’ ही नाटके सादर होतील.