नगर जिल्हा न्यायालयात मराठी संवर्धन पंधरवडा सुरू


सामना प्रतिनिधी, नगर

मातृभाषेत दिले जाणारे ज्ञान हे सहज अवगत होत असते. त्यामुळे ज्ञानसंपन्न होण्यासाठी मातृभाषा हे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश कमलाकर कोठेकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे येथील जिल्हा न्यायालयात मराठी संवर्धन पंधरवाड्याचा शुभारंभ आणि न्यायालयीन प्रकरणांध्ये मराठी भाषेचा परिणामकारक वापर करणे या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन न्या. कोठेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधिश एस. व्ही. माने, पेराज सारडा महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. माहेश्‍वरी गावित, न्या. एस. आर. जगताप, न्या. व्ही. व्ही. बांबर्डे, न्या. श्रीमती एम. व्ही. देशपांडे, न्या. एस. आर. नावंदर, न्या. बी. आर. गुप्ता, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. पद्माकर केस्तीकर, नगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. शेखर दरंदले आदी उपस्थित होते.

न्या. कोठेकर पुढे म्हणाले. आपली मातृभाषा मराठी आहे. या भाषेचा गौरव संत ज्ञानेश्‍वरांसह अनेक संत महंतांनी माझ्या मराठीचा बोलु कौतुके, अमृतातेही पैजा जिंके या शब्दात केलेला आहे. त्यामुळे मातृभाषेचा अंगिकार करताना तिच्या संवर्धनाकडेही सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. न्यायालयाचे कामकाज मराठी भाषेतून केल्यास पक्षकाराला ते समजेल व आपला निकाल काय लागला हे स्पष्ट कळेल त्यामुळे त्याचे समाधान होईल तसेच झालेली चुक कळल्याने तो पुढील काळात चांगले वागण्याचा प्रयत्न करेल, वकीलांनी दैनंदीन कामकाज मराठी भाषेतून करुन संवाद साधावा तसेच कामकाजाचा अर्जही मराठी भाषेतूनच करावा असे आवाहनही न्या. कोठेकर यांनी केले.

प्रा. डॉ. माहेश्‍वरी गावित म्हणाल्या मराठी भाषेला माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राजभाषेचा दर्जा मिळवून दिला. मात्र पुढील काळात मराठी भाषेबद्दलची तीव्रता कमी झाली. मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी मराठी संवर्धन पंधरवाडा साजरा करावा लागतो, तोही महाराष्ट्रात ही अतिशय खेदाची बाब आहे. लोकशाहीमध्ये मराठी भाषा रुजविण्याची गरज निर्माण झाली आहे न्यायालयीन कामकाजाचा संबंध सर्वच क्षेत्रात येत असतो. त्यामुळे मराठी भाषेचा वापर न्यायालयीन कामकाजात होणे आवश्यक आहे. साक्ष, फिर्याद, निकालपत्रवाचन इत्यादी कामकाज भाषेतून होणे आवश्यक आहे. मराठी परिभाषेचा वापर केल्यामुळे भाषा समृद्ध होईल. त्यासाठी पदनाम कोश, शासन व्यवहार कोश, महाराष्ट्र कोश, ज्ञानकोश याचा उपयोग केला जावा असे ते म्हणाले.

ऍड. शेखर दरंदले यांनी प्रास्तविक करताना सांगितले की, आपली मराठी भाषा ही 1500 वर्षांपूर्वीची आहे. मराठी भाषेचा विस्तार होण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषेचा जगात 15वा तर देशात तिसरा क्रमांक लागतो. सर्वांनी मराठी भाषेचा व संस्कृतीचा विस्तार केला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्या. श्रीमती व्ही. सी. देशपांडे यांनी केले तर आभार न्या. आर. ए. शेख यांनी मानले. यावेळी जिल्हा न्यायालयातील प्रबंधक सी. के. तरडे, ऍड. शिवाजी कराळे यांच्यासह सर्व अधीक्षक, सहायक अधीक्षक कर्मचारी व वकील उपस्थित होते.