आयटी क्षेत्रात मराठीची ऐट!


>> ज्योत्स्ना गाडगीळ

‘ज्याला ज्या विषयात गती आहे, त्याने त्या विषयाचा सखोल अभ्यास करून आपल्या ज्ञानाचा इतरांना उपयोग करून दिला पाहिजे. ते ज्ञान मिळवण्यासाठी वाट्टेल ते कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपल्या मातृभाषेचा पुरस्कार केला पाहिजे’, सांगत आहेत, वेबडिझायनर सचिन पिळणकर. सचिन ह्यांनी संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठीत वेगवेगळ्या विषयांचा विपुल खजिना वाचकांसाठी मोफत खुला करून दिला आहे. खगोलशास्त्रावर आधारित पहिले मराठी संकेतस्थळ सुरू करण्याचा मान त्यांचा आहे.

एक सर्वसाधारण विद्यार्थी ते तंत्रज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे व्याख्याते हा टप्पा पार केला आहे, वेब डिझायनर सचिन पिळणकर ह्यांनी! घराला हातभार लावता यावा म्हणून वीस वर्षांपूर्वी त्यांनी ‘टायपिस्ट’ म्हणून नोकरी पत्करली. तेव्हा त्यांचा पहिल्यांदा कॉम्प्युटरशी प्रत्यक्ष संबंध आला. त्या काळात कॉम्प्युटरमधील तज्ज्ञांना मोठी मागणी होती, मात्र सचिन ह्यांना महागडे कोर्स करणे परवडणार नव्हते. त्यांनी स्वयंअध्ययनातून कॉम्प्युटरची इत्थंभूत माहिती घ्यायची, असे ठरवले आणि सहकाऱ्यांचेही काम मागून घेत ते कॉम्प्युटरवर ‘हातसफाई’ करू लागले. रोजच्या कामातून त्यांचा नवनव्या सॉफ्टवेअरशी संबंध आला, नवनवे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले आणि काही काळातच कॉप्युटरवर पूर्णपणे हुकूमत मिळवली. त्यानंतर त्यांचा इंटरनेटच्या महाजालात प्रवेश झाला.

आज कोणतेही संकेतस्थळ आपण दोन सेकंदात उघडतो, संकेतस्थळाची लिंक कॉपी-पेस्ट करायलाही आपल्याला दोन सेकंदाचा अवधी लागतो, मात्र हेच तंत्रज्ञान वीस वर्षांपूर्वी शिकायला सचिन ह्यांना तब्बल दोन महिने लागले होते. जेव्हा त्याचे तंत्र कळले, तो त्यांच्या आयुष्यातला ‘युरेक्का’ क्षण होता. स्वयंअध्ययनातून विविध गोष्टी शिकताना त्यानंतरही अनेकदा असे ‘युरेक्का’ क्षण त्यांच्या वाट्याला आले. परंतु, हे ज्ञान स्वत:पुरते मर्यादित न ठेवता, त्यांनी इतरांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. खेडोपाडी तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून त्यांनी स्वत: गावोगावी जाऊन कॉम्प्युटरचे प्राथमिक ज्ञान दिले. कॉम्प्युटर प्रशिक्षण देणाऱ्या सीडीचे मोफत वाटप केले. त्यांच्या मदतीने हजारो तरुणांची संगणकाशी मैत्री झाली.

इंटरनेटचे मायाजाल सुरू झाल्यावर तिथे मुशाफिरी करताना सचिन ह्यांच्या लक्षात आले, की इंटरनेटवर वेगवेगळ्या विषयांची माहिती जास्तीत जास्ती इंग्रजीत आहे. सर्व विषयांचे मराठीकरण करणे त्यांना शक्य नव्हते, म्हणून त्यांनी आपल्या आवडीच्या विषयांनी मराठी संकेतस्थळांची सुरुवात केली.

बालपणापासून त्यांना खगोलशास्त्रात रुची होती. शालेय वयात वरळी येथील नेहरू तारांगण येथे त्यांनी ग्रह-ताऱ्यांचे काही प्रयोग पाहिले होते. तेव्हापासून शालेय अभ्यासक्रमात फारसा रस नसला, तरी त्यांनी खगोलशास्त्रातील पुस्तकांचा फडशा पाडला होता. इंटरनेटशी मैत्री झाल्यावर तिथेही ह्या विषयाशी संबंधित माहितीचा शोध घेतला, परंतु बहुतांश माहिती इंग्रजीत असल्याचे आढळून आले. खगोलशास्त्राची माहिती मराठीत सोप्या शब्दांत इंटरनेटवर उपलब्ध करून दिली, तर तिला मोठा वाचक वर्ग मिळेल आणि विद्याथ्र्यांना खगोलशास्त्राची गोडी लागेल. ह्या विचाराने त्यांनी विविध पुस्तकातून संदर्भ घेऊन सोप्या शब्दात माहिती देणारे `अवकाशवेध.कॉम’ नावाचे संकेतस्थळ तयार केले. २००३ मध्ये ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर ह्यांच्या हस्ते त्या संकेतस्थळाचे अनौपचारिक उत्घाटन केले आणि खगोलशास्त्राची माहिती देणारे अवकाश वाचकांसाठी खुले करून दिले. ग्रह, तारे, सूर्योदय, सूर्यास्त, नक्षत्र, आकाशगंगा, विश्वनिर्मितीची माहिती, अवकाश निरीक्षण, उल्कावर्षांचे निरीक्षण, निरीक्षणाची नोंद, खगोलसंस्थांची माहिती, खगोलशास्त्रावरील संकेतस्थळे, खगोलशास्त्राचे सॉफ्टवेअर अशी भरमसाठ माहिती त्या संकेतस्थळावर वाचायला मिळते. कोणतीही जाहीरात न करता काही काळातच त्या संकेतस्थळाला हजारो वाचकांनी भेट दिली. एव्हाना १५ लाख वाचक तिथे सभासद झाले आहेत. नेहरु तारांगणचे संचालक अरविंद परांजपे ह्यांनी त्यांच्या एका वृत्तपत्रातील लेखमालेत `अवकाशवेध’ संकेतस्थळाची प्रशंसा केली होती, ती आपल्या दृष्टीने मोठी पावती होती, असे सचिन सांगतात.

‘संकेतस्थळाला जेवढी जास्त मागणी, तेवढे जास्त उत्पन्न!’ हे आजचे समीकरण असूनही सचिन ह्यांनी ही सेवा मोफत ठेवली. तसेच जाहिराती स्वीकारल्या नाहीत. ते सांगतात, ‘माझ्या दृष्टीने ही समाजसेवा आहे. माझ्या ज्ञानाचा, माहितीचा फायदा आज शालेय विद्यार्थ्यांपासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना, तसेच सदर विषयातील रसिकांना होत आहे, ह्याचे मला समाधान आहे. व्यावसायिक म्हणून मी जी वेबडिझायनिंगची कामे घेतो, त्या उत्पन्नात माझे आणि माझ्या कुटुंबाचे भागते. उर्वरित पैसा मी पुन्हा संकेतस्थळांच्या गुंतवणुकीसाठी वापरतो. संकेतस्थळांच्या निर्मितीसाठी पैसे आकारले जातात, मात्र मी ते स्वेच्छेने करत असल्यामुळे त्यातून उत्पन्नाची आशा ठेवत नाही. ह्या माध्यमातून मला समाजसेवेची संधी मिळत आहे, असे मी समजतो. हे सर्व काम मी एकहाती करतो, त्यामुळे बऱ्याचदा वेबसाईट अपडेटेड ठेवण्यात कमी पडतो. परंतु, माझ्या परीने मी प्रयत्न सोडलेले नाहीत.’

प्रत्येकाने आपल्या उपजत कलेचा, विकसित केलेल्या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग समाजासाठी करावा आणि आपल्याबरोबर इतरांना नवे काही करण्याची प्रेरणा देत राहावी, असे सचिन सांगतात. अवकाशवेधच्या निर्मितीनंतर त्यांनी आणखी २७ मराठी संकेतस्थळे सुरू केली होती, परंतु पैशांअभावी त्यापैकी अनेक संकेतस्थळे बंद करावी लागली. सध्या ते एकूण सहा संकेतस्थळांचे काम बघत आहेत, शिवाय चरितार्थासाठी वेबडिझायनिंगची कामेही त्यांची सुरू असतात. वैयक्तिक आणि सामाजिक कामात ते सरमिसळ करत नाहीत. ते सांगतात, ‘समाजसेवेतून ओळखी वाढतात, लोकांना आपले काम आवडले, तर ते वैयक्तिक कामासाठी आपल्याशी संपर्क साधतात आणि त्या कामातून उदरनिर्वाहाचा प्रश्न भागतो. म्हणून समाजसेवेत पैसा मिळवणे हा हेतू ठेवू नये, तुम्ही तुमच्या क्षेत्रात सच्च्या दिलाने प्रयत्न करत असाल, तर यश, पैसा, प्रसिद्धीसाठी तुम्हाला धडपडावे लागत नाही, ती आपोआप येते!’

सचिन ह्यांनी मध्यमवर्गीय युवकांना डोळ्यासमोर ठेवून ऑनलाईन कॉम्प्युटर प्रशिक्षण देणारे कोर्स अल्पदरात संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. हजारो तरुणांनी त्याचा लाभ घेतला आहे व आजही घेत आहेत. ‘काहीही अडल्यास लगेच फोन करा’ अशी सूचना तिथे दिलेली असल्यामुळे त्यांचा फोन सतत खणखणत असतो.

कॉम्प्युटर, इंटरनेट आणि खगोलशास्त्र ह्या विषयांवर व्याख्याने देण्यासाठी सचिन ह्यांना शाळा, महाविद्यालयांतून आमंत्रणे येऊ लागली. नोकरी सांभाळून कॉम्प्युटरसंबंधित उभा केलेला डोलारा सांभाळणे त्यांना अशक्य होऊ लागले. त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि कॉम्प्युटरवर आपल्या उदरनिर्वाहाची संपूर्ण भिस्त टाकली. सचिन हे वाणिज्य पदवीधर असल्यामुळे त्यांना आवड असूनही संगणक आणि खगोलशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेता आले नाही आणि पदवी मिळवता आले नाही, परंतु त्या त्या विषयातील विद्याथ्र्यांना आपण दिलेली माहिती उपयोगी पडत असल्याचे समाधान ते व्यक्त करतात.

अवकाशवेधप्रमाणे ‘सहजच.कॉम’, ‘नेटशिका.कॉम’, ‘संकल्पउद्याचा.कॉम’, ‘माझीसाईट.कॉम’, ‘कॉम्प्युटरएक्सपर्ट.कॉम’ अशी त्यांची मराठीतील अन्य संकेतस्थळेही अतिशय लोकप्रिय आहेत. शालेय विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध वाटा आणि स्पर्धांची माहिती कळावी, ह्यासाठी ते संबंधित क्षेत्रातील व्यक्तींच्या मदतीने ‘करिअरच्या संधी’ ह्या संकेतस्थळाची निर्मिती करणार आहेत. जिथे स्पर्धापरीक्षांबरोबरच कला, क्रीडा, साहित्य इ. विषयात देश-विदेश पातळीवर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांची माहिती दिली जाणार आहे.

‘मराठी भाषेवर आपले प्रेम असले, तरी आपण भाषातज्ज्ञ नाही’, असे सचिन आपल्या प्रत्येक संकेतस्थळावर विनम्रपणे नमूद करतात. अपेक्षित बदल सुचवा, व्याकरणाच्या चुका कळवा, त्या लगेचच सुधारल्या जातील अशी ग्वाहीदेखील देतात. त्यांच्या ह्या वृत्तीतून त्यांची विनम्रता आणि अभ्यासू वृत्ती दिसून येते. ते अतिशय वेगाने बोलतात, पण तितक्याच वेगाने कामही करतात.

गुगल सर्च इंजिनवर मराठी भाषेचा चौथा क्रमांक आहे. मराठी भाषिकांनी मराठीचा आग्रह धरला आणि आपल्या परीने विविध विषयांची जास्तीत जास्त माहिती इंटरनेटवर उपलब्ध करून दिली, तर मराठी भाषेचे महत्त्व वाढेल, असे सचिन सांगतात.

आज इंटरनेटवर विविध विषयांवर मराठीत माहितीचा बराच स्रोत उपलब्ध आहे. तरीसुद्धा सचिन त्यांच्यापरीने नेटवर जास्तीत जास्त माहिती मराठीतून पुरवण्याचे काम नेटाने करत आहेत. आणि मराठी भाषेचा पुरस्कार करून दररोज ‘मराठी भाषा दिन’ साजरा करत आहेत. त्यांच्या जिद्दीला आणि भाषाप्रेमाला सलाम!

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected]