नाट्यस्पर्धा – सर्जनशीलतेस वाव


सामना प्रतिनिधी । मुंबई

आजची तरुणाई अभिव्यक्त होण्यासाठी असंख्य आधुनिक माध्यमांनी अवगत. तरीही नाटकांच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्यासाठी नाटय़लेखन स्पर्धांसारखे उपक्रम अर्थातच हवेत..

नवीन लेखकांना लिहिण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे. व्यावसायिक रंगभूमीवर नवनव्या नाटकांची निर्मिती आणि नवोदित लेखकाला निर्मात्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘कल्पना अनेक आविष्कार अनेक’ ही अनोखी नाटय़लेखन स्पर्धा पहिल्यांदाच अभिषेक थिएटर्समार्फत ‘मराठी नाटक’ ग्रुपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. ३१ मेपर्यंत लेखकांना आपल्या आवडीच्या विषयावर लिहिण्याची संधी या स्पर्धेमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रंगभूमीवर नवीन नाटकांपेक्षा जुनी नाटके सादर होतात, नवीन लेखकांचा शब्दसाठा कमी पडतोय का ही खंत व्यक्त केली जाते. व्यावसायिक रंगभूमीला नवीन लेखकांकडून असलेल्या अपेक्षा या स्पर्धेतून शोधता येतील. नवनवीन संहिता मिळाव्यात या उद्देशाने आम्ही ही स्पर्धा घेत आहोत, असे आविष्कारचे आशीर्वाद मराठे सांगतात.
ही स्पर्धा अनुभवी, नवोदित आणि सर्व वयोगटांसाठी खुली आहे.

अभिनेता, लेखक, निर्माते, दिग्दर्शक यांनी सुचवलेल्या थिमवर ‘दोन अंकी’ नाटकाचे लेखन करणे, विषयाप्रमाणे कल्पनाविस्तार करून नाटय़लेखन करायचे आहे. या स्पर्धेकरिता प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे, कुमार सोहोनी, डॉ. अजित बांदिवडेकर, सुनील बर्वे, जयवंत वाडकर अशा काही प्रसिद्ध अभिनेत्यांनी तसेच प्रसिद्ध योजनकार शीतल तळपदे, नाटय़निर्माते प्रसाद कांबळी, लेखिका आणि अभिनेत्री मानसी मराठे, प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत भालेकर अशा नामवंत व्यक्तींनी नाटय़लेखनाचे अनेक पैलू लेखकांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय स्वसंकल्पनेवर आधारित लिखाणाचे स्वातंत्र्यही लेखकांना देण्यात आले आहे.

नवोदित लेखकाला निर्मात्यांशी जोडणे
बक्षीसपात्र किंवा निवड झालेल्या संहितांची व्यावसायिक नाटकासाठी निवड केली जाणार आहे. तसेच या संहिता निर्मात्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. जेणेकरून नवीन लेखक निर्मात्याशी जोडला जाईल. स्पर्धेच्या परीक्षक मंडळाचे स्वरूप एक लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ आणि एक सामान्य प्रेक्षक यांचे असेल. एकच विषय काहींना विनोदी पद्धतीने, काहींना गंभीर पद्धतीने आणि काही लेखकांना वेगळ्या पद्धतीने मांडण्याची संधी मिळेल. दर्जेदार संहिता या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होण्यासाठी नवोदित लेखकांना या स्पर्धेकरिता आवाहन करत आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे.

क्रिप्ट बँक … नवी संकल्पना
स्पर्धेला यश मिळाल्यास उपलब्ध नाटकांच्या संहितांचे नाटय़वाचन, कार्यशाळा आणि वेगवेगळ्या विषयांच्या नाटकांची अनेक संहितांची एक बँकच तयार करता येईल. यामुळे कॉमेडी नाटक, सामाजिक विषय, एकपात्री, दोन अंकी नाटक असे अनेक उपक्रम भविष्यात राबवता येतील. यामुळे उपलब्ध संहितेनुसार नाटक सादर करता येईल, असे विश्वास आशीर्वाद मराठे यांना वाटतो.