सह्याद्री’ वाहिनीवरून मराठी मालिकांची निर्मिती बंद

मुंबई-प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी असा नारा देणारी दूरदर्शनची ‘सह्याद्री’ वाहिनी आता घराघरातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. सध्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम बंद करून जुन्या आणि ‘डब’ मालिकांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे. यामुळे मराठी कलाकारांची मोठी गळचेपी होत आहे.

‘सह्याद्री’ वाहिनीवरून ‘धिना धिन धा’, ‘दम दमा दम’, ‘अंताक्षरी’, ‘म्युझिक मस्ती गप्पा गाणी’, ‘क्रीडांगण’, ‘हसतखेळत’, ‘वा रे वा’, ‘हसण्यावरी नेऊ नका’ असे काही लोकप्रिय कार्यक्रम अचानक बंद करण्यात आले आहेत. त्यांच्या जागी ‘एक किरण रोशनीची’, ‘चंद्रमुखी’, ‘एयरहोस्टेस’, ‘सुकन्या’, ‘अनुदामिनी’, ‘मंगलसूत्र एक मर्यादा’, ‘मनी उमंग जगण्याची’, ‘संकटमोचन हनुमान’, ‘रणभेरी’ अशा हिंदी मालिका डबिंग करून दाखवण्यात येत आहेत. डबिंग मालिकांची जी स्थिती आहे तीच प्रायोजित मालिकांची आहे. ‘जिनी आणि मिनी’, ‘विधिलिखित’, गुलमोहोर’, ‘स्वामी’, ‘संसार माझा वेगळा’ या मालिकाही पुन्हा प्रसारित होत आहेत.

याविरोधात शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी दूरदर्शनचे अप्पर महानिर्देशक मुकेश शर्मा यांना पत्र लिहिले आहे. मराठीत मालिकांची निर्मिती होऊ शकत नाही की मराठीत लेखक, कलाकार यांची कमतरता आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. दूरदर्शनच्या नॅशनल चॅनेलवरून प्रसारित झालेल्या २० ते २५ मालिकांना केवळ चार-पाच व्यक्तींचा ठुप आवाज देण्याचे काम करीत आहे. यातून डबिंग करणाऱया निर्मिती संस्थांसोबत दूरदर्शनच्या अधिकाऱयांचे काही साटेलोटे आहे का, याकडे त्यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे. याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मराठी कलाकार आणि कर्मचाऱयांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या