साहित्य क्षेत्रात ‘मराठी रीडर डॉट इन’ची अनोखी मुहूर्तमेढ

सामना ऑनलाईन । मुंबई

आजकाल व्हॉट्सऍप, फेसबुक अशा वेगवेगळ्या सोशलसाईट्सवर मिळेल ते वाचणारी तरुणाई दिसत आहे. ई-बुकच्या माध्यमातूनही विविध पुस्तके वाचली जात आहेत. पण आता या स्मार्ट वाचकांसाठी राज्यातील सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन ‘मराठी रीडर डॉट इन’ हे अॅप बाजारात आणले असून त्यावर पहिल्या टप्प्यात तब्बल १०० ते १५०  पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे साहित्य क्षेत्रात अनोखी मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.

सध्या ई-बुकच्या माध्यमातून इंटरनेटवर हजारो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, एक अॅप डाऊनलोड करून त्या माध्यमातून पुस्तके खरेदी करता येणे ही एक वेगळीच संकल्पना आहे. मराठीत पहिल्यांदाच प्रकाशन क्षेत्रातील मौज, पॉप्युलर, राजहंस, रोहन, ज्योत्स्ना आणि कॉंटिनेंटल या सहा प्रकाशन संस्थांनी ई-बुकच्या माध्यमातून मराठी रीडर डॉट इन या अॅपचा श्रीगणेशा केला आहे.

डोंबिवली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी म्हणजेच ३ फेब्रुवारी २०१७ रोजी ‘मराठी रीडर डॉट इन’ या अॅपची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून वाचकांना त्यांच्या आवडीची आणि हवीहवीशी पुस्तकेही ई-बुकच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. याबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठी रीडर डॉट इनचे संचालक मिलींद परांजपे, प्रदीप चंपानेरकर, डॉ. सदानंद बोरसे, मुकुंद भागवत, देवयानी अभ्यंकर आणि अस्मिता मोहिते आदी उपस्थित होते.

छापील पुस्तकांपेक्षा कमी किंमत

अॅपच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणाऱ्या ई-बुकची किंमत छापील पुस्तकांच्या किंमतीपेक्षा कमी असणार आहे. तसेच सध्या ई-बुकच्या किंमतीत छापील पुस्तकांच्या किंमतीपेक्षा २५ टक्के सवलत देण्यात येईल, तर संमेलनानिमित्ताने महिनाभर पुस्तके खरेदी करणाऱ्यांना ई-बुकवर छापील पुस्तकाच्या किंमतीपेक्षा ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. दरम्यान, ई-बुकच्या लेखकांना रॉयल्टीही चांगली मिळणार आहे.

*अॅपमधील पुस्तकातील मजकूर सुरक्षित असून तो कॉपी करता किंवा त्याची प्रिंट देता येणार नाही.

* हे अॅप ऍण्ड्रॉइड, विण्डो मोबाईल स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कम्प्युटर यावरही डाऊनलोड करता येईल.

* तीनच डिव्हाईसवर एक पुस्तक डाऊनलोड करता येईल. चौथ्या डिव्हाईसवर पुस्तक डाऊनलोड होणार नाही.

* एक पुस्तक तीन सदस्यांना वाचता येईल.

*पुस्तकांचा बॅकग्राऊंड बदलता येणार. हे ऍप कुठल्याही फॉण्टमध्ये उघडता येईल तसेच टिपण आणि मार्किंग करण्याची सोय असेल.

फास्टर फेणेही उपलब्ध 

जुनी पिढी फास्टर फेणेसारखी पुस्तके वाचत मोठी झाली. सध्या अशाप्रकारची पुस्तके बाजारात उपलब्धच नाहीत. हल्लीच्या पिढीतल्या वाचकांना या पुस्तकातील फास्टर फेणे या धम्माल पात्रातली गंमत माहीत नाही. अशा प्रकारची अनेक जुनी पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध नाहीत. अशाप्रकारची दुर्मिळ पुस्तकेही या अॅपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.