मराठी विद्यार्थी अनुभवणार साहित्य संमेलनाचा सोहळा

माधव डोळे । मुंबई

विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीबाबत आकर्षण निर्माण व्हावे यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी अनेक नवे उपक्रम हाती घेतले आहेत. १६ फेब्रुवारीपासून बडोद्यात सुरू होणाऱया साहित्य संमेलनात शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाही आमंत्रण दिले आहे. गुजरातच्या विविध मराठी शाळांमधील तब्बल पाच हजार विद्यार्थी साहित्य संमेलनाचा सोहळा अनुभवणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बडोद्यासह अहमदाबाद, नवसारी, अंकलेश्वर, सुरत तसेच वापीमधील मराठी शाळांना रीतसर निमंत्रण पाठविण्यात आले असून यानिमित्ताने गुजरातमधील मराठी शाळांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण होणार आहे. साहित्य संमेलनामुळे गुजरातमध्ये बऱयाच वर्षांनंतर मराठीचा बोलबाला निर्माण होणार असून एरवी मराठीच्या पाठय़पुस्तकांमध्ये असलेले साहित्यिक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना भेटणार आहेत.

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीत भरत आहे. ८३ वर्षांनंतर प्रथमच विश्वामित्रातीरी सारस्वतांचा मेळा भरत असून बडोद्यामधील मराठी माणसांबरोबरच मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांनादेखील मोठी मेजवानी मिळणार आहे. इंग्रज राजवटीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा संस्थानला खूप महत्त्व होते. बडोदा गुजरातमध्ये असले तरी मराठीची परंपरा काही प्रमाणात का होईना टिकून आहे. संमेलनाच्या निमित्ताने मराठी कुटुंबांतील मुलांची नाळ पुन्हा मूळ प्रवाहाला जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

बडोद्यात १५ वर्षांपूर्वीपर्यंत सात मराठी शाळा होत्या. दि महाराणी चिमणाबाई हायस्कूल, जयश्री मॉडेल हायस्कूल, महाराणी कन्या विद्यालय, एच. जे. पारिख मॉडेल हायस्कूल, जयश्री कन्या विद्यालय, ज्योती विद्यालय, बी. डी. एच. मॉडेल हायस्कूल अशी या शाळांची नावे आहेत. या शाळांपैकी सहा शाळा काळाच्या ओघात बंद पडल्या असून केवळ ‘महाराणी चिमणाबाई हायस्कूल’ सुरू आहे. १०७ वर्षांपूर्वी गायकवाड यांनीच ही शाळा सुरू केली. पहिली ते बारावीपर्यंत असलेल्या या मराठी शाळेत सध्या सुमारे सातशे मराठी विद्यार्थी शिकत आहेत. सर्वाधिक विद्यार्थी असलेली ही गुजरातमधील एकमेव मराठी शाळा असून हे सर्व विद्यार्थी १७ फेब्रुवारीला साहित्य संमेलनात हजर राहणार असल्याची माहिती माजी प्राचार्य डॉ. धनंजय मुजुमदार यांनी दै.‘सामना’ शी बोलताना दिली.

शिक्षकांशी संवाद
मराठी शाळा टिकविण्यासाठी महाराष्ट्रात विविध संस्था प्रयत्नशील असून बडोद्यातदेखील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गुजरातमधील मराठी शाळांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होणार आहे. सुरतमध्ये पूर्वी आठ मराठी शाळा होत्या. आता फक्त उदन येथील ‘सार्वजनिक हायस्कूल’ ही एकमेव शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थीही संमेलनासाठी येणार आहेत. वापीमधील मुलेही येणार असून या सर्व शाळांना आयोजकांनी रीतसर निमंत्रण पाठविले आहे. एवढेच नव्हे तर धनंजय मुजुमदार, संजय बच्छाव आदी आयोजकांनी मराठी शाळांमधील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना साहित्य संमेलनाचे महत्त्व पटवून दिले.

मध्य प्रदेशातील विद्यार्थीही येणार
बडोद्याच्या संमेलनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन, धार, देवास, महू येथील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी लेखकांशी गप्पा मारणार असून हजारो मराठी पुस्तके हाताळण्याची संधी त्यांना मिळणार आहे.