पंचविशी

ssanjay-narvekar

क्षितिज झारापकर,[email protected]

मराठीमध्ये ज्युबिली स्टार तसे कमीच… पण आज एका लोकमान्य सुपरस्टारची सिल्व्हर ज्युबली होते आहे. संजय नार्वेकरांच्या या यशाबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत…

25 वर्षांत 25 व्यावसायिक नाटकं असं पहिल्या नाटकाच्या वेळी वाटलं होतं का?

– आपण आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे काम करत राहिलं की, काहीही साध्य होऊ शकतं हे यातून सिद्ध होतं. मी सुरुवातीलाच उलटा प्रवास सुरू केला. महाविद्यालयातून एकांकिका करत असतानाच विनय आपटेंकडे सहाय्यक म्हणून काम करत होतो. ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’ नावाची मालिका होती. त्यात माझी छोटी भूमिकाही होती. मग आपटय़ांच्याच ‘आम्ही जगतो बेफाम’ नाटकातून पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीवर आलो. त्यानंतर मात्र मी आजतागायत एकही मालिका केलेली नाही.

पण सिनेमा करत होतात की तुम्ही! तिथेही वेळ द्यावा लागतोच?

– बरोबर आहे, पण सिनेमाच्या तारखा आपल्याला आधी मिळतात. त्याप्रमाणे आपण वेळ आखू शकतो. शिवाय सिनेमाचे लोक ऍडजस्ट करू शकतात. मला मध्ये तीन तास किंवा संध्याकाळी तीन तास लवकर सोडू शकाल का? असं मी विनवायचो. ते शक्य झालं तर तसे प्रयोग लावयचो. ‘ऑल द बेस्ट’ हिट झाल्यावर मग आपण वर्षाला एक नाटक करायचंच हा विचार मी केला. काही वर्षी दोन दोन नाटकंही केली. तेव्हा वेळेचं गणित कठीण होत गेलं. मग माझ्या बायकोने असिताने ती सूत्र हाती घेतली. तू तुझ्या अभिनयावर फोकस ठेव हे तिचं म्हणणं होतं. माझ्या यशात तिचा 50 टक्के वाटा आहे.

नाटक सिनेमात असणाऱया कुणालाही विचारलं की मन रमतं कुठे तर उत्तर ‘नाटक’ असंच असतं. पण ते तसं का असतं याचं उत्तर काय…

कारण नाटकातून नटाला खूप काही शिकायला मिळतं. आपण नाटकाचे प्रयोग करतो. प्रत्येक प्रयोगात मी वाक्य जशीच्या तशी सारखीच बोलतो असं नाही. कधी स्पीड वेगळा असतो, कधी वेगळा प्रयत्न करायचा असतो. ते केल्यावर मला त्याचा परिणाम लगेच मिळतो. मला कळतं की ‘अरे, आज असं केल्याने असं झालं.’ माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं. सिनेमात ते संभवत नाही. पण प्रत्येक नटाला आपली कला ही जास्त रसिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून आपली लोकप्रियताही वाढावी हे वाटतच असतं. या दोन गोष्टी सिनेमातून अधिक शक्य आहेत. पण तरीही प्रत्येक नटाने मग या दोन माध्यमांमधला आपला संचार कसा नियंत्रित करायचा याचा विचार करायला हवा.

संजय नार्वेकर या ब्रॅन्ड नेमवर तिकिटबारीवर चालणारं नाटक असं कोरलं गेलं. हे प्रयत्नपूर्वक कमर्शियलायझेशन की वेगळं काही…

मला नाटकं तशी मिळत गेली हे मुख्य कारण. ‘ऑल द बेस्ट’ जोमात असतानाच ‘वास्तव’ हा चित्रपट आला. डेढफुटय़ा जागतिक पातळीवर फेमस झाला. मी परदेशी गेल्यावर मला पाकिस्तानी, अफघाणी लोकंही ओळखू लागले. कारण तो पिक्चर सगळीकडे पाहिला गेला. मग आपण कमर्शियली सक्सेसफुल होऊ शकतो हे जाणवलं आणि तशी नाटकं, सिनेमे केले. पण दर दोन तीन नाटकांमागे एखादं तरी ‘अशी पाखरे येती’, ‘अधांतर’, ‘खेळीमेळी’ असेल याचीही खबरदारी घेतली. याचं खरं तर श्रेय माझ्या मित्रपरिवारातील वैचारिकतेला. राजीव नाईकसारखे गुरुमित्र मला पटवून देत की शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा सर्व पातळ्यांवर कसदार अभिनय जमायला हवा व त्यासाठी मग अशी वेगळ्या घाटणीची नाटकं करायला हवीत.

नव्वदच्या दशकात मराठी नाटकाला गर्तेतून काढणारं ‘ऑल द बेस्ट’ आणि मराठी सिनेमाला नवं रूप देणाऱया ‘अगं बाई अरेच्चा’ या दोन्ही माइलस्टोन प्रॉडक्शन्समध्ये असणारा संजय नार्वेकर आता आपलं पंचविसावं नाटक होतं ‘कुरूप वेडे’ घेऊन येतोय. या नाटकाची आणि पुढे या सुपरस्टारच्या कारकीर्दीची गोल्डन ज्युबिली होवो हीच सदिच्छा.