मराठी विषय शिक्षिकेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी, सोमय्यातील शिक्षक उद्या सामूहिक रजेवर

सामना प्रतिनिधी । मुंबई

के. जे. सोमय्या कॉलेजमधून कामावरून काढून टाकलेल्या शिक्षिकेला पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी २१ सप्टेंबरला कॉलेजमधील सर्व शिक्षक सामूहिक रजेवर जाणार आहेत. या शिक्षिकेचे पद रद्द केल्याप्रकरणी मुंबई ज्युनियर कॉलेज शिक्षक महासंघाने यापूर्वी आंदोलन केले होते. मात्र कॉलेज प्रशासनाकडून या आंदोलनाला कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने सर्व शिक्षक २१ सप्टेंबरला दुपारी २ ते ४ यावेळेत पुन्हा कॉलेज परिसरात धरणे आंदोलन करणार आहेत.

मराठी विषयाला कात्री लावण्यासाठी कॉलेजने मराठी विभागाचे एक पद रद्द केले. संचमान्यतेत मराठीच्या दोन पूर्णवेळ पदांना मान्यता असतानाही विद्यार्थ्यांचा मराठी विषयाकडील कल कमी करण्यासाठी शिक्षकांचा बळी देण्यात येत आहे. सध्या सोमय्यात बारावीमध्ये मराठी विषय घेऊन ३०० विद्यार्थी शिकत आहेत. तर अकरावीच्या १२० विद्यार्थ्यांनी मराठी विषय घेतला आहे. अकरावीचे ऑनलाइन प्रवेश सुरू असताना मराठी विषय घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या खूपच जास्त होती. पण प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना विनाअनुदानित तत्त्वावरील अन्य विषय घेण्यास भाग पाडले गेले, असा आरोप शिक्षक महासंघाचे प्रा. अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच मराठीच्या शिक्षिकेला पुन्हा कामावर रुजू करून घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

मेनन कॉलेजच्या शिक्षकांचेही काम बंद

कॉलेज प्रशासनाच्या गैरकारभाराविरोधात उद्या २० सप्टेंबरला दुपारी १२.३० ते ४.३० यावेळेत भांडुप येथील मेनन ज्युनियर कॉलेजचे शिक्षकही काम बंद आंदोलन करणार आहे. मेनन कॉलेज अल्पसंख्यांक दर्जाचे आहे. या कॉलेजमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱया शिक्षकांना पदोन्नतीसाठी डावलले जात आहे. १२ वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी दिली जाते. पण हे दोन्ही लाभ घेण्यापासून ज्येष्ठ शिक्षकांना कॉलेज प्रशासन डावलत आहे, असा आरोप या कॉलेजमधील शिक्षकांनी केला आहे. कॉलेज प्रशानाविरोधात आम्ही उद्या आवाज उठविणार आहोत, असे जीवशास्त्र विषयाच्या शिक्षिका गिरिजा सुंदर यांनी सांगितले.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमय्या तसेच मेनन कॉलेज प्रशासनाला पत्र लिहिले असून शिक्षकांच्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यासही सांगितले आहे.

मेनन कॉलेजमध्ये होणाऱया शिक्षकांच्या आंदोलनाला कांजुरमार्ग पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही शिक्षक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.