आवली त्यांच्या लेखणीतून उलगडते

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

मंजुश्री गोखले. एक शांत सुरक्षित आयुष्य जगतानाही तुकयाची आवली त्यांच्या मनात प्रकटली आणि आवेगाने, उत्कटतेने लेखणीतून उमटत राहिली…

ब्रेकफास्ट झाला की आवरून दहा ते साडेबारा मी संत नामदेवांवर कादंबरी लिहिते आणि दुपारी तीन ते पाच एक सामाजिक कादंबरी लिहिते आहे सध्या. शिवाय दिवाळी अंकाचं काम, घरातलं काम असतंच.’ विविध विषयांवर लिखाण करणाऱया, कोल्हापूरच्या मंजुश्री गोखले मला हे सांगत होत्या तेव्हा वाटलं, एखादी सुगरण नाही का, देवाचं पंचपक्वान्नाचं ताट आणि मुलांना हवा असलेला, चमचमीत नवीन आधुनिक पदार्थ, सहजतेनं एकाच वेळी करत… मंजुश्रीताई तितक्याच सहजतेनं एकाच वेळी संतसाहित्य आणि कोर्टरूम ड्रामावरची एखादी कादंबरी लिहू शकतात.

मी त्यांना विचारलं, ‘डबा बनवून द्यायचा असेल आणि त्याच वेळी तासाभरात लेख लिहून द्यायचा आहे, अशी परिस्थिती आली तर काय कराल?’ ‘पटकन होणारा डबा देऊन चटकन लिहायला बसेन.’ त्या हसत म्हणाल्या. मंजुश्रीताईंच्या बोलण्यातली सकारात्मकता सतत जाणवत होती अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून. जबाबदारी आणि लेखन यांचा तोल साधण्याचं कौशल्य त्यांनी अवगत केलं आहे. त्यांचा जन्म इचलकरंजीचा. वडील मिलमध्ये जनरल मॅनेजर. मिलकडून मिळालेला छान मोठा बंगला. बाग फुलझाडं. त्यांची काळजी घेणारा माळी. घरात नोकरचाकर दिमतीला. मांजर, कुत्रा, ससा, पोपट असे आवडीनं पाळलेले पाळीव प्राणी. त्यांचं बालपण सुखातच गेले. चार मुलांनंतर झालेली मुलगी म्हणून खूप लाड झाले. त्या काळच्या वडिलांसारखे नव्हते त्यांचे वडील. प्रेमानं कितीदा तरी त्यांनी आपल्या मुलीला भरवलं. आई शिक्षिका. तिच्याकडून प्रेमापेक्षा शिस्तीचे धडे जास्त मिळाले. सांजवात लागायच्या आत घरी यायचं, हातपाय धुवून देवाला नमस्कार करायचा, चपला ओळीनं मांडून ठेवायच्या. घरात सुबत्ता होती ती मेहनतीनं आलेली. त्यामुळे उधळपट्टी वर्ज. वाचनाची प्रचंड आवड आईला. ‘सुरुवातीला डोंबिवलीत काही महिने आणि मग पुन्हा इचलकरंजीत मिलच्या बंगल्यात आलो आम्ही. सासरी सांस्कृतिक वातावरण होतं माझ्या. सासूबाई, नणंदा गायच्या माझ्या. पण माझा ओढा साहित्याकडे. धाकटा मुलगा 11 ते 5 शाळेत जायला लागला तेव्हा वाटलं, काहीतरी करायला हवं आपण. खरं तर लग्नानंतर दहा वर्षांत पत्रसुद्धा लिहिलं नव्हतं मी. नंतर मग मॉडर्न हायस्कूलमध्ये नोकरी लागली आणि माझ्या आयुष्यातला तो टार्ंनग पॉइंट ठरला.

इचलकरंजीवरून आम्ही कोल्हापूरला आलो, तेव्हा संजय भगत यांची ओळख झाली. त्यांनी माझी पहिली एकांकिका छापली. जीवनसत्त्वांचं महत्त्व सांगणारी होती ती. ‘अबकडई’ नावाची… मला एम.ए. करायचं होतं. नवऱयानेही सांगितलं होतं, जितकं शिकायचं तितकं शिक. एम.ए.ला संत तुकाराम हा 100 मार्काचा पेपर होता. त्यांच्या जन्मापासून वैकुंठ गमनापर्यंतचा अभ्यास करावा लागला त्यावेळी. तेव्हा जाणवलं, तुकाराम महाराज आकाशाएवढे आहेत. पण त्यांच्या पत्नीबद्दल, आवलीबद्दल एखादं वाक्यच सगळीकडे वाचायला मिळायचं मला. वाटायचं, त्यांच्या बायकोची एवढी उपेक्षा का? तिच्याबद्दल लिहिलं पाहिजे. दहा वर्षे ही आवली मला लिखाणासाठी साद घालत होती. मग वाटलं आपणच का लिहू नये? मी अंतर्बाह्य थरारले.

बोलता-बोलता मंजुश्रीताई गहिवरल्या. त्यांना थोडावेळ बोलताच येईना. आम्हाला काही वेळ थांबावं लागलं पुढचं बोलण्यासाठी. आवली त्यांच्या हृदयात वसली असल्याचंच ते लक्षण होतं. मग त्या सांगायला लागल्या ‘चारशे वर्षांत आवलीबद्दल कुणी लिहिलं नाही… आणि जे लिहिलं होतं ते ‘आवली कजाग, कर्कशा आहे’ असंच होतं. सॉक्रेटिसच्या बायकोनं त्याला विष दिलं, आवली तशीच होती, असंही तिच्याबद्दल बोललं गेलं होतं. पण मला वाटलं, आपल्या पतीच्या निष्काम कर्मयोग जगण्याच्या वृत्तीमुळे, पदरी असलेल्या सहा मुलांच्या पोटात जर चार घासही जात नसतील तर एक आई म्हणून तिला त्रास होत असणारच ना… आणि हे ज्याच्यामुळे होतंय, त्या विठ्ठलावरही तिचा राग असणारच ना. आवलीची भूमिका मला जाणवली, त्यामुळे तिचं बोलणं, विठ्ठलाला शिव्या घालणं याचं समर्थन करावं असं वाटायला लागलं. किंबहुना ते समर्थनीय आहे असंही वाटायला लागलं. बघता बघता वीस प्रकरणांची कादंबरी पूर्ण झाली. खरंच सांगते, लिहिताना मला वाटायचं की, समोर मला बसवून कुणीतरी ही कहाणी सांगतंय. माझ्या डायरीतच लिहिली मी ती. पण खरंच या संपूर्ण 20 प्रकरणात एक शब्दही मी खोडून परत लिहिलेला नाही. इतकं ते आतून उतरत गेलं. या कादंबरीत काही आक्षेपार्ह नाही ना हे मला तपासून घ्यायचं होतं. तुकारामांच्या पत्नीची बाजू मांडली होती त्यामुळे खूप दडपण होतं समाजाच्या प्रतिक्रियांचं. संत अभ्यासक म्हणायचे, ‘तुम्ही ब्राह्मण, कोल्हापुरात राहाता, तुकारामांच्या बायकोबद्दल लिहिलं म्हणजेच तुकोबांना त्यात शिव्याच असणार, असं कादंबरी न वाचताच कुणाला वाटलं आणि फेकला दगड तुमच्यावर तर?’ म्हणून मग सहा महिने कपाटात पडून राहिली कादंबरी. पुण्यातली मैत्रीण शामला देसाई हिनं मात्र पुढाकार घेतला. डॉ. अशोक कामत यांना ही कादंबरी शामलामुळे वाचायला दिली. संत साहित्याचे एवढे मोठे अभ्यासक ते. ते म्हणाले, ‘या कादंबरीवर आक्षेप घेणाऱयाचा पहिला दगड मी खाईन, एवढी उत्तम आहे ही आणि यात काहीही आक्षेपार्ह नाही.’ मग धीर करून मेहता पब्लिकेशनला ही कादंबरी पाठवली आणि त्यांनी तातडीनं ती प्रकाशित केली.’

‘या पुस्तकानं मला महाराष्ट्रात नावाजलं. कोल्हापूर सोडून. जशी ब्राह्मण म्हणून मी कोल्हापुरात करत असलेली नोकरी गेली. तशीच ही उपेक्षा.’ नंतर पुणे विद्यापीठात संत चोखामेळावर एक निबंध वाचायला त्यांना अशोक कामत यांनी सांगितलं. खूप अभ्यास करून त्यांनी निबंध तर वाचलाच, पण नंतर त्यांच्यावर कादंबरी लिहिली, ‘जोहार मायबाप जोहार’. त्यालाही 6 पुरस्कार मिळाले. या कादंबरीची प्रस्तावना मागायला त्या डॉक्टरांकडे गेल्या तेव्हा ते म्हणाले, ‘मला तुम्ही गुरू मानता ना… मग गुरुदक्षिणा म्हणून संत जनाबाईवर लिहा. संत नामदेव आणि जनाबाईंबद्दल खूप वाईट तर्क समाजाने केलेले आहेत आणि तुमच्या भाषाशैलीनं ते वाईट तर्क पुसले जातील असं मला वाटतं.’ मग जनाबाईंचा अभ्यास केला आणि त्यांनी कादंबरी लिहिली. मंजुश्रीताई म्हणाल्या, ‘हा अभ्यास करताना जाणवलं की, या संतांच्या अभंगांची माहिती लोकांना आहे, प्रबंधसुद्धा लिहिले गेले आहेत, तरीही त्यांचं व्यक्तिमत्त्व लोकांपर्यंत नीट पोहोचलंच नाहीए. हा अनमोल ठेवा जर दुर्लक्षित राहिला तर मग आपल्या समाजाच्या हातात राहील काय? फक्त रक्तरंजित इतिहास? फाळणी? मोगलांची आक्रमणं?’ सोपानदेवांवर त्यासाठीच त्यांना लिहावसं वाटलं. सोपानदेव ज्ञानेश्वरांइतकेच बुद्धिमान होते. म्हणूनच ज्ञानेश्वरी साडेदहा हजार ओव्यांची आहे, पण सोपानदेव यांनी भगवद्गीतेच्या 750 श्लोकांवर, 750 ओव्या लिहिल्या. कट टू कट भाषांतर ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी केलं.

सध्या मंजुश्रीताईंचा बंगला कोल्हापुरात आहे. पाच हजार स्क्वेअर फुटांचा हा प्लॉट. बावीसशे स्क्वेअर फूट बांधकाम. पुढेमागे बाग. मुलानं त्या बागेत केलेलं कारंजे. सगळ्या भाज्या, फळं यांची झाडं. सोबतच दुर्मिळ असा कदंब वृक्ष. या कदंब वृक्षाच्या नावानं त्यांनी कवितासंग्रहाला कदंब पुरस्कारही सुरू केला आहे. झाडाच्या नावानं साहित्यातला पुरस्कार देण्याचा हा एकमेव असा पहिलाच प्रयत्न असावा असं त्यांना वाटतं. संसारातल्या, मालिका विश्वातल्या अनेक नकारात्मक अनुभवांची वाच्यता बोलता बोलता त्यांच्याकडून झाली होती. पण नकारांना बाजूला सारून होकार जगण्याची आणि तो होकारच इतरांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची इच्छा त्यांनी वारंवार बोलून दाखवल्यामुळेच जे जे भलं आहे तेच लोकांपुढे मांडावं, या त्यांच्या इच्छेचा मान राखत हा लेख मी लिहिला आहे.