‘कान्स’ चित्रपट महोत्सवात #505′ या मराठी लघुपटाची निवड 

सामना ऑनलाईन । मुंबई 
जगप्रसिद्ध असलेल्या ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत कुलकर्णी या मराठी तरूणाच्या  ‘#505’ या मराठी लघुपटाची कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. हा चित्रपट महोत्सव ६ मे रोजी होणार आहे.
#505′ हा लघुपट चांगल्या आणि वाईट मनोवृत्तीच्या दोन व्यक्तींच्या जीवनावर आधारित आहे. या दोन्ही मनोवृत्तीच्या व्यक्तींचे जीवन संकेतने या लघुपटातून अत्यंत कल्पकतेने मांडले आहे. या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन संकेत कुलकर्णी याने केले आहे. तसेच श्वेतप्रिया यांनी या लघुपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे तर, निहार दाभडे यांनी संगीत दिले आहे.
या लघुपटाचे चित्रीकरण मुंबईत करण्यात आले असून आयलाईन्स पिक्चर्स बॅनरखाली या लघूपटाची निर्मीती करण्यात आली आहे. अभिजीत देशपांडे, हृषिकेश सांगलीकर आणि सारांश मोहिते हे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. तर, सिद्धांत याळगी, अमित नेगान्धी, वृषाली नेगान्धी,चिन्मय शेंडे, दीपक होळी, विठ्ठल याळगी, नीता व प्रदीप कुलकर्णी यांनी या लघुपटाच्या निर्मीतीसाठी मेहनत घेतली आहे. कान्स पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. त्यामुळे या जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सवात निवड झाल्याने सर्व स्तरातून या लघुपटाच्या संपुर्ण टीमचे कौतुक केले जात आहे.

<