दक्षिण-मध्य रेल्वेच्या धोरणांविरोधात उग्र आंदोलनाचा इशारा


सामना प्रतिनिधी । परभणी

देशात एकीकडे रेल्वे गाड्यांचा वेग वाढवून प्रवाशांना सुविधा देण्याचे धोरण निश्चित केले असताना, दुसरीकडे मात्र नांदेड विभागातील प्रवाशांवर सातत्याने अन्याय केला जात आहे़.नांदेड ते पुणे दरम्यानच्या 556 कि.मी. अंतरासाठी जलद रेल्वेला 11 तासांचा वेळ निर्धारित असताना 15 तासांवर पोहचला असल्याचा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे़. खासगी ट्रॅव्हल्स चालकांचे हित जोपासण्याचे रेल्वेकडून धोरण अवलंबिले जात आहे का ? असा सवाल केला जात आहे. दक्षिण-मध्य रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याची मागणी करत रेल्वेच्या ढिसाळ कारभाराविरोधात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी उग्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दिला आहे़.

मराठवाडा विभाागात सर्वसाधारणपणे रेल्वे गाड्यांचा वेग तासी 60 कि.मी. येवढा आहे़. एकिकडे हा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न होत असताना मराठवाड्यातील प्रवाशांना मात्र तासी 27 कि.मी. वेगाने पुणे गाठावे लागणार आहे़. त्यामुळे 556 कि.मी. अंतर कापण्यासाठी 15 तास लागणार असून, यामुळे रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा होणार आहे़. तर लातूर रोड ते नांदेड या अंतरासाठी 7 तास आणि लातूर रोड ते परळी अंतरासाठी 3 तास 10 मिनिटे एवढा वेळ लागणार आहे़.

विशेष म्हणजे रेल्वेचे भाडे देखील वाढविण्यात आले असून स्लिपरच्या टिकीटासाठी 285 रुपयांऐवजी आता 378 रुपये म्हणजे एका तिकीटामागे 90 रुपयांचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागणार आहे़. त्यामुळे विशेष गाड्यांच्या नावावर प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे. यावेळी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा़ सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ़ राजगोपाल कालानी आदींनी रेल्वे प्रशासनाच्या धोरणावर टीका केली असून येत्या 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.