धुळ्यात अतिक्रमणबाधितांचा महापालिकेवर मोर्चा

सामना ऑनालाईन । धुळे

शहरातील स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमण बाधितांचे त्याच जागेवर पुनर्वसन करावे या मागणीसाठी धुळ्यातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. आयुक्तांनी यावेळी आलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. दसेरा मैदान परिसरात स्टेशन रोडवरील अतिक्रमितांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले. परंतु शिष्टमंडळातील नागरिक स्टेशन रोडवरच पुनर्वसन करावे या मागणीवर अटळ होते. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली.

धुळे महापालिकेने शहरातील स्टेशन रोडवर २५ ऑक्टोंबर रोजी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविली. यात २७२ जणांची घरे काढण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन करून चार दिवस झाले. ज्या नागरिकांची परिस्थिती ठीक होती किंवा ज्यांच्याकडे पर्याय होता त्यांनी जागा सोडली. परंतु ज्यांना काहीही पर्याय नाही अशी अनेक कुटुंब आजही उघडय़ावर संसार थाटून आहेत. अतिक्रमण निर्मुलन करताना शासनाने आमचा कोणताही विचार केला नाही.

गेल्या साठ ते सत्तर वर्षांपासून या वसाहतीत रहिवास होता. परंतु आमची कोणतीही पर्वा केली नाही. प्रशासनाने आमचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. स्टेशन रोडपासून निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने महापालिकेवर पोहोचला. आंदोलकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. यामुळे महापालिकेचे प्रवेशद्वार बंद झाले. प्रवेशद्वारावर आंदोलक बसल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली.

दोन जागांवर पुनर्वसन करण्याचा पर्याय
आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. या वेळी आंदोलकांना दोन जागांवर पुनर्वसन करण्याचे सूचविण्यात आले. यातील दसेरा मैदान ही जागा आपल्या शहरातील मध्यवर्ती असल्याचे सांगण्यात आले. परंतु आंदोलकांनी दसेरा मैदानच्या जागेसही नकार दिला. या रस्त्यावर आमचे व्यवसाय आहेत. तेथेच आमचे पुनर्वसन करावे असा आग्रह आंदोलकांनी घेतला. पुनर्वसनाची जागा निश्चित करा. तसा ठराव शासनाकडे पाठवावा लागेल. शासनाच्या परवानगीनंतरच कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. परंतु आंदोलक त्याच जागेवर पुनर्वसनाच्या मागणीवर ठाम असल्याने चर्चेतून काही मार्ग निघाला नाही. या वेळी शहर पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता.