शारापोव्हाला पुनरागमनाची संधी द्यायलाच हवी!

सामना ऑनलाईन, मोनाको – पाचवेळा टेनिस ग्रॅण्ड स्लॅम पटकावण्याचा पराक्रम करणाऱ्या रशियाच्या मारिया शारापोव्हाला टेनिस कोर्टवर पुनरागमन करण्याची दुसरी संधी द्यायलाच हवी, कारण उत्तेजक सेवनाच्या चाचणीनंतर तिने बंदीच्या काळात बरेच काही भोगले आहे, असे आवाहन तीन वेळा विम्बल्डन जेतेपद पटकावणारा जर्मनीचा माजी टेनिसस्टार बोरीस बेकर याने केले आहे.

२०१६ च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेदरम्यान डोपिंग चाचणीत शारापोव्हाच्या रक्तात मेल्डोनियम हे प्रतिबंधित उत्तेजक सापडल्याने तिला आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) टेनिस क्षेत्रातून दोन वर्षांसाठी निलंबित केले होते. त्यानंतर ‘कॅस’ने तिच्या शिक्षेत ९ महिन्यांची कपात केली होती. आता १५ महिन्यांच्या प्रतिबंधानंतर शारापोव्हा येत्या एप्रिलमध्ये टेनिस कोर्टवर परतू शकणार आहे.