पॅराशुट खोबरेल तेलाविरोधात प्रचार करणाऱ्या युट्युबरला कोर्टात खेचले

सामना ऑनलाईन । मुंबई

पॅराशुट खोबरेल तेलाविरोधात प्रचार करणाऱ्या युट्युबरला कंपनीने कोर्टात खेचले आहे. अभिजीत भन्साली असे या युट्युबरचे नाव आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओतील माहिती खोटी आणि निंदात्मक असून स्पर्धकांच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले असल्याचा आरोप पॅराशुट तेल उत्पादक मारीको कंपनीने केला आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्या प्रसिद्ध उत्पादनाविरोधात सोशल मीडिया किंवा वेबसाईटच्या माध्यमातून प्रचार करणे योग्य आहे किंवा नाही याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून खटल्याची सुनावणी घेऊन लवकरच निर्णय दिला जाणार आहे.

भन्साली याने 1 सप्टेंबर 2017 रोजी पॅराशुट खोबरेल तेलाविरोधात टीकात्मक व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये त्याने इतर सेंद्रिय तेल आणि पॅराशुट तेलाची तुलना केली आहे. या व्हिडीओत त्याने दोन्ही तेलाच्या बाटल्या फ्रिजमध्ये ठेवून त्यांच्या शुद्धतेची आणि रंगातील बदलाची तुलना केली आहे. तसेच व्हिडीओतून त्याने पॅराशुट तेल केसांसाठी, त्वचेसाठी आणि इतर वापरासाठी अयोग्य असल्याचे म्हटले असून ते जेवणासाठी वापरले तर चालेल असेही म्हटलंय. भन्सालीच्या युट्युब चॅनलचे 1 लाख फॉलोअर्स असून हा व्हिडीओ 1.10 लाख वेळा पाहिला गेला आहे.

मारीको कंपनीने या प्रकरणी भन्सालीला कायदेशीर नोटीस पाठवून संबंधीत व्हिडिओतून कंपनीच्या उत्पादनाविरोधात खोटा प्रचार होत असल्यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे तो व्हिडीओ काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र भन्सालीने प्रत्युत्तर देत हे आपल्याला राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र असल्याचे म्हणत व्हिडीओ काढण्यास नकार दिला. संबंधित व्हिडीओतून आपला कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणत्याही उत्पादनाला बदनाम करण्याचा प्रयत्न नसल्याचे सांगत त्याने कंपनीचे आरोप फेटाळले आहेत.