झेंडू फक्त 5 रुपये किलो; श्रावणातच उठला फुलांचा ‘बाजार’

सामना प्रतिनिधी । कल्याण

अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच अस्मानी संकटाचा सामना करीत असताना आता ऐन श्रावणात फुलांचा अक्षरशः ‘बाजार’ उठला आहे. येथील होलसेल मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांना किलोमागे केवळ पाच रुपये एवढा दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. फुलांच्या उत्पादनाचा खर्चदेखील सुटत नसल्याने अनेकांनी फुले विकण्यापेक्षा रस्त्यावर फेकून दिली. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडण्याऐवजी त्यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सरासरी 150 ट्रक, टेम्पो यांच्या माध्यमातून शेतीमाल येतो. शहापूर, मुरबाड, आंबेगाव, नगर, नाशिक, लासलगाव येथून भाजी, फुले, फळे, कांदा, बटाटा यांची आवक होते. तर गुजरात, कर्नाटक, तामीळनाडू येथून अन्नधान्याची आवक होते. दररोज सरासरी दहा हजार क्विटल माल बाजार समितीत येतो. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे. मात्र आवक वाढल्याने दरांची घसरण होत आहे. घावूक बाजारात झेंडू अवघा पाच रुपये किलोने विकला जात आहे. उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याने कवडीमोल दरात फुले विकण्यापेक्षा ती रस्त्यावर फेकून दिली.

सर्वाधिक उलाढाल मात्र शेतकरी उपाशी
दादर फूल मार्केटनंतर सर्वाधिक उलाढाल कल्याण फूल मार्केटमध्ये होते. कल्याण बाजार समितीत 450 फूल विक्रेते रोज फूल विक्रीचा व्यवसाय करतात. हजारो टन फुले नगर, पुणे या भागातून कल्याण बाजार समितीत विक्रीसाठी येतात. श्रावण महिन्यात पूजेसाठी मोठय़ा प्रमाणात फुलांची विक्री होते. मात्र आवक वाढल्याने दर पडले आहेत. व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी सध्या स्थिती आहे.