बाप्पाच्या स्वागतासाठी मार्केट हाऊसफुल्ल!

सामना प्रतिनिधी । मुंबई

गणेशोत्सव जेमतेम पाच दिवसांवर आल्याने लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. पूजेसाठी आणि सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी दादर, लालबाग, बोरिवली येथे ग्राहकांची झुंबड उडाली होती. रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असतानाही ‘तुळशीवाडीचा राजा’, ‘कोलभाट लेनचा राजा’, ‘प्रगती सेवा मंडळ’ या मंडळांच्या बाप्पांचे धूमधडाक्यात आगमन झाले.

गणेशोत्सवात खरेदीसाठी ग्राहकांची पहिली पसंती असते ती दादर आणि लालबाग मार्केटला. गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने बहुतेकजण भरपावसातही खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. मार्केटमध्ये अनेकजण छत्री आणि रेनकोट घालून मखर, कंठी, धूप, अगरबत्तीसह सजावटीसाठी फुलदाणी, रंगीबेरंगी पडदे, सोन्याचा मुलामा दिलेले अलंकार, रांगोळी, लाइटस् खरेदी करत होते. चिनी मालाऐवजी देशी बनावटीच्या वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. सकाळपासूनच दादरच्या छबिलदास गल्लीत सजावटीचे साहित्य घेण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती. सायंकाळच्या वेळी गर्दीतून वाट काढणेही मुष्कील झाले होते. अनेकांनी गर्दीची पर्वा न करता डोक्यावर मखर घेऊन रेल्वेनेच जाणे पसंत केले.

इकोफ्रेंडली मखरांना पसंती
थर्माकोलऐवजी अनेक ग्राहकांची मागणी स्वस्तात मस्त इकोफ्रेंडली मखरांना होती. थर्माकोलच्या मखरांचे भावही भरमसाठ असल्याने अनेकजण दुकानवाल्यांशी भाव कमी करण्यासाठी हुज्जत घालत होते. मयूरासन, अष्टविनायक मंदिर, राजमहाल अशा मखरांना ग्राहकांची पसंती दिली.

गोल फिरणारा थ्रीडी उंदीर!
गणेशोत्सवानिमित्त बाजारात दरवर्षी नवनवे ट्रेंड पाहायला मिळतात. यंदा बाजारात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते हातात मोदक घेऊन गोल फिरणाऱ्या थ्रीडी उंदरांनी. ४०० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत याची किंमत होती. याशिवाय सोन्याचा मुलामा दिलेल्या अलंकारांनाही ग्राहकांची पसंती होती.