चेहऱ्यावर ऍसिड फेकलेल्या बन्सीचे शुभ‘मंगल’ सूर

2

सामना ऑनलाईन,ठाणे

हॅलो.. आपण कोण बोलताय.. असा फोन तिने केला, पण समोरून आवाज आला, सॉरी.. राँग नंबर. मात्र या राँग नंबरमुळेच तिला नवं आयुष्य मिळालं. कारण  तिला मिळाला जीवनसाथी. ठाण्याच्या विवाह नोंदणी कार्यालयात  आज शुभमंगल सावधान..चे सूर गुंजले आणि त्या दोघांनी एकमेकांना हार घातले. हा विवाह नेहमीसारखा नव्हता. जवळच्या नातेवाईकानेच ऑसिड फेकल्यामुळे विद्रुप चेहरा झालेली कळव्याची ललिता बन्सी, तर वर होता मालाड येथील रवी शंकर. दोघांचे सूर जुळले आणि त्यांनी आपल्या आयुष्याची आजपासून नव्याने सुरुवात केली. हा विवाह सर्व तरुण-तरुणींसाठी आदर्श ठरला आहे.

ठाण्याच्या तलावपाळीजवळील विवाह नोंदणी कार्यालयात रोज नोंदणी पद्धतीने विवाह होतो. मात्र आज सकाळपासून या कार्यालयात अनोख्या जोडप्याचा विवाह पार पडला. संगणकावर वाजणारे सनईचे मंजूळ सूर.. वधू-वरांकडील जवळचे निवडक नातेवाईक यांच्या साक्षीने  हा विवाह सोहळा झाला. हा योग जुळवून आणला तो ऑसिड सर्व्हायवल साहस फाऊंडेशनने. कळव्याच्या वाघोबानगर येथे राहणारी ललिता बन्सी ही चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी गेली होती. त्यावेळी मामाच्या मुलाबरोबर तिचा किरकोळ वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की,  त्या मुलाने राग काढण्यासाठी ललिताच्या चेहऱयावर थेट ऑसिड ओतले.

या घटनेमुळे ललिताचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले. तिचा चेहरा  विद्रुप झाला.. काय करावे हे सुचेना.. साहस फाऊंडेशनला ही बाब समजली तेव्हा या संस्थेचे पदाधिकारी प्रणाली शाह यांनी पुढाकार घेऊन ललिताच्या चेहऱयावर सुमारे तीन लाख रुपये खर्च करून मुंबई इस्पितळात उपचार केले. मात्र जवळच्याच नातेवाईकाने केलेल्या ऑसिड हल्ल्याने ललिताचे मानसिक धैर्य खचले. एके दिवशी तिने आपल्या मैत्रिणीला मोबाईलवरून फोन केला, परंतु तो मालाडमध्ये राहणाऱया रवीशंकर सिंग याला लागला.  दोघांचे बोलणे झाले. एकमेकांची विचारपूस झाली. त्यातून ओळख वाढत गेली व त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली आणि आज अखेर ललिता व रवीशंकर हे दोघेही विवाहबंधनात अडकले. एका खासगी कंपनीत नोकरीला असलेल्या रवीने ललिताला नवे जीवन मिळवून दिले आहे.

शस्त्रक्रियेचा खर्च विवेक ओबेरॉय करणार

ललिता बन्सी हिच्या चेहऱयावर आणखी एक शस्त्र्ाक्रिया केली जाणार असून तिचा खर्च हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विवेक ओबेरॉय करणार आहेत. त्यामुळे तिचा चेहरा पुन्हा पहिल्यासारखा होण्याची आशा निर्माण झाली आहे.

चेहऱ्यावर नाही.. मनावर प्रेम केले..

लग्न म्हटलं की मुलगी कशी दिसते.. काय करते.. असे अनेक प्रश्न विचारले जातात. ललिताच्या आयुष्यात तो काळाकुट्ट दिवस आला आणि तिचा चेहरा विद्रुप झाला. मात्र मी तिच्या चेहऱयावर नव्हे तर तिच्या मनावर प्रेम केले. अशा मुलींनादेखील समाजाने स्वीकारण्याची गरज आहे असं रवीशंकर याने म्हटले आहे.