विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने केली तिसऱ्या प्रियकराची हत्या

सामना ऑनलाईन । कोलकाता

प्रियकराने लग्नाला नकार दिल्यामुळे एका विवाहित महिलेने तिच्या एका साथिदाराच्या मदतीने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यात घडली आहे. या महिलेला हत्येत मदत करणारा देखील तिचा प्रियकरच असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्या महिलेला व तिच्या साथिदाराला अटक करण्यात आली आहे.

सखी चक्रवर्ती असे त्या महिलेचे नाव असून तिचे विजय कार या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. सखीने विजयकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र विजयने तिला लग्न करायला नकार दिलेला. याचाच राग सखीच्या मनात खदखदत होता. त्यामुळे तिने विश्वजीत या तरुणाची मदत घेत विजयची हत्या केली. सखीने विश्वजीतसोबत प्रेमाचे नाटक देखील केले होते. त्यामुळे विश्वजीत तिच्या प्रेमाखातर तिच्यासोबत विजयची हत्या करण्यास तयार झाला होता.

गुरुवारी विजयच्या पालकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता गुरुवारी रात्री विजयचा मृतदेह सापडला. त्यानंतर विजयच्या नातेवाईकांनी सखीने विजयकडे लग्नाचा तगादा लावला असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच विजयचा मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवून सखीला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी सखी व तिचा प्रियकर विश्वजीतला अटक केली. त्या दोघांची चौकशी केल्यानंतर त्या दोघांनीही त्यांचा गुन्हा कबूल केला.