सच्चा आणि लढवय्या

मार्शल अर्जन सिंग हे हिंदुस्थानी सैन्यदलातील एक सच्चा योद्धा होते. फिल्ड मार्शल सर माणेकशॉ यांच्यानंतर ‘मार्शल’ हा बहुमान आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ मिळालेले अर्जन सिंग हे हिंदुस्थानी सैन्यदलातील एकमेव अधिकारी. एवढेच नव्हे तर जिवंतपणी विमानतळाला नाव देण्यात आलेले ते एकमेव लष्करी अधिकारी आहेत. वयाच्या ४५ व्या वर्षी सर्वात तरुण वायुसेनाप्रमुख बनणारेदेखील अर्जन सिंग हे एकमेवच. अर्थात, हवाई दलातील लढाऊ अधिकारी म्हणून एवढेच त्यांचे वेगळेपण किंवा योगदान नव्हते. दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या कामगिरीची दखल तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी घेतली. वडील आणि आजोबा त्यावेळच्या ब्रिटिश आर्मीमध्ये घोडदळात असल्याने ‘लष्करी बाळकडू’ अर्जन सिंग यांना घरातच मिळाले होते. साहजिकच त्यांचाही ओढा लष्कराकडेच होता. मात्र त्यातही हवाई दलाचे आकर्षण जास्त असल्याने वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी ब्रिटनमधील क्रॅनवेल येथील हवाई दल अकादमीत प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे १९३८ मध्ये हवाई दलात ते लढाऊ वैमानिक म्हणून रुजू झाले. दुसऱ्या महायुद्धात इम्फाळ आणि रंगून आघाडीवरील लढायांत त्यांनी भाग घेतला. त्यावेळी गाजविलेल्या शौर्याबद्दल त्यांना ‘डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस’या शौर्यपदकाने गौरविण्यात आले होते. पुढे स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानी हवाई दलातही त्यांच्या शौर्यशाली कामगिरीची परंपरा सुरूच राहिली. विशेषतः १९६५च्या युद्धात पाकिस्तानला नमविण्यामध्ये आपल्या हवाई दलाचे योगदान मोठे होते आणि त्याचे श्रेय मार्शल अर्जन सिंग यांनाच जाते. त्यावेळी पाकिस्तानने हिंदुस्थानवर ‘ऑपरेशन ग्रॅण्ड स्लॅम’अंतर्गत हल्ला केल्यावर अखनूरसारख्या महत्त्वाच्या शहराला लक्ष्य केले गेले होते. त्यावेळी तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हिंदुस्थानी हवाई दलाचा ‘सपोर्ट’ मागितला होता आणि त्यासाठी किती वेळ लागेल, असे अर्जन सिंग यांना विचारले होते. अर्जन सिंग यांचे उत्तर होते ‘एक तास’ आणि खरोखरच एक तासाच्या आतच हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला करून त्याचे कंबरडे मोडले होते. खरे म्हणजे आपले वायुदल त्यावेळी अननुभवी होते आणि अर्जन सिंग हेदेखील अवघ्या ४४-४५ वर्षांचे. मात्र जबरदस्त जिगर आणि काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी हे वैशिष्टय़ असलेल्या अर्जन सिंग यांनी त्या युद्धात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. त्याचसाठी त्यांना नंतर ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले. २००२ मध्ये ‘मार्शल ऑफ द इंडियन एअर फोर्स’ हा सर्वोच्च किताब त्यांना देण्यात आला. लष्करातील फिल्ड मार्शलच्या समकक्ष असणारा हा गौरव प्राप्त करणारे हिंदुस्थानी हवाई दलातील ते पहिलेच आणि एकमेव अधिकारी ठरले. निवृत्त होईपर्यंत त्यांनी तब्बल ६० प्रकारच्या विमानांमधून उड्डाण केले. एक वैमानिक म्हणून एवढय़ा मोठय़ा संख्येने विमाने हाताळणारे अर्जन सिंग हे देशातील एकमेव वायुदल अधिकारी होते. त्यांच्या नसानसात देशभक्ती आणि सच्चा सेनानी होता. हिंदुस्थानचा एक सच्चा हवाई योद्धाच काळाच्या पडद्याआड गेला आहे.