शितल जाधव आजपासुन मराठा  क्रांती मोर्चाची मुलगी : पाटील

 

सामना प्रतिनिधी । वडवणी

साळिंबा येथिल शितल जाधव ही आजपासुन मराठा क्रांती ठोक मोर्चाची  मुलगी आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासह तिच्या पुर्ण भविष्याची जवाबदारी मराठा क्रांती ठोक मोर्चाची आहे. असे जाहीर करुन महाराष्ट्रातील मराठा समाजाने आपल्या कोणत्याही  आडचणी आम्हाला सांगा मराठा क्रांती मोर्चा आपल्या कोणत्याही आडचणी सोडविण्यास समर्थ आहे. मात्र यापुढे महाराष्ट्रात कुठेही मराठा समाजाने आत्महत्या सारखे पाऊल उचलु नये असे कळकळीचे अवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी  केले.

वडवणी तालुक्यातील साळिंबा येथील सरस्वती जाधव यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणापायी आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती संतोष डावकर यांच्यामार्फत आबासाहेब पाटील यांना मुंबईत मिळाल्यावर रविवारी आबासाहेब पाटील यांनी बीड जिल्ह्यातील साळिंबा गावात जाऊन जाधव कुटुंबाची भेट घेतली. यावेळी मृत सरस्वती जाधव यांची मुलगी शितल हिला मायेने जवळ घेऊन “शितल बेटा तु आज पासुन मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुलगी आहेस. तुझे वैद्यकीय शिक्षण झालेच पाहिजे. मराठा क्रांती मोर्चा तुझे पूर्ण भविष्य घडविण्याची जवाबदारी स्विकारीत आहे. यापुढील तुझा पूर्ण खर्च करुन मराठा क्रांती मोर्चा व मी स्वतः तुझ्या पाठीशी पालक म्हणुन खंबीर उभा आहे”. असे आबासाहेब पाटील यांनी जाहीर करून महाराष्ट्रातील मराठा समाजातील लोकांनी यापुढे कोणत्याही आडचणी असतील त्या आम्हाला सांगा, आम्ही सोडविण्यास तयार आहोत मात्र अडचणींनी खचुन जाऊन महाराष्ट्रात   आत्महत्या सारखे पाऊल उचलु नका अशी हात जोडत विनंती त्यांनी केली. त्यानंतर आबासाहेब पाटील यांनी मामला येथील दत्ता लंगे  या आत्महत्या करणाऱ्या मुलाच्या घरी जाऊन विचारपुस केली. “परळी येथे झालेल्या  आंदोलनामध्ये दत्ता लंगे माझ्यासोबत सहभागी होता त्याने हे पाऊल उचलल्याचे आश्चर्य वाटत  आहे” असे ते म्हणाले. यापुढे मराठा तरुणांनी असे आत्महत्येचे पाऊल उचलू नये आपल्या आईवडिलांचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी काही आर्थिक मदतही लंगे कुटुंबाला केली. साळिंबा व मामला येथे आबासाहेब पाटील यांच्यासोबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे महाराष्ट्रातील विविध भागातुन आलेले मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक उपस्थित होते.

शीतल जाधव हिच्या वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी आबासाहेब पाटील आणि क्रांती मोर्चाच्या टीमने एक लाख 67 हजार रुपये शुल्क मंगळवारी भरणार आहेत. शीतलचा येत्या दोन दिवसात पदवी प्रवेशाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे यावेळी स्पष्ट केले.