वडिलांनी जमीन विकून उभारले शहीद मुलाचे स्मारक

सामना ऑनलाईन । पाटणा

जम्मू-कश्मीरमधील उरी भागामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या वडिलांनी जमीन विकून मुलाचे स्मारक बांधले आहे. उरी हल्ल्याला एक वर्ष होऊन गेले. मात्र सरकारने उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप शहिदाच्या कुटुंबियांनी केला आहे. बिहारच्या गया जिल्ह्यातील शहीद सुनील कुमार विद्यार्थी या जवानाच्या वडिलांनी हा आरोप केला आहे.

उरी हल्ल्यानंतर शहीद झालेल्या मुलाच्या गावी आरोग्य केंद्र उभारण्याचे आश्वासन सरकारने दिले होते तसेच गावातील शाळेला शहीद सुनीलचे नाव आणि प्रवेशद्वार बनवण्याचे आश्वासनही सरकारने दिले होते. ही सर्व आश्वासने आता हवेत विरली असल्याचे शहीद सुनीलचे वडील मथुरा प्रसाद यादव यांनी सांगितले. मुलगा शहीद झाल्यानंतर १५ दिवस अनेक बड्या-बड्या लोकांनी आपली भेट घेत मोठी आश्वासनं दिली होती, मात्र ती अद्यापही पूर्ण झाली नसल्याची खंत मथुरा यादव यांनी व्यक्त केली.

गया जिल्ह्यातील बोकनारी गावात शहीद सुनील कुमार विद्यार्थी यांचे घर आहे. या गावात आजही कच्च्या रस्त्याने जावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात रस्ता बंद होतो आणि गावाचा शहराशी असलेला संपर्क तुटतो. शहिदाच्या अंत्यसंस्कारावेळी आणि त्यानंतर अनेक राजकारण्यांनी त्याच्या गावी जात कुटुंबियांची भेट घेतली होती आणि आश्वासनांचा पाऊस पाडला. मात्र नंतर काहीही झाले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.