मेरी कॉमचा निर्णायक ‘पंच’, आशिया कपच्या फायनलमध्ये धडक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानची स्टार बॉक्सर आणि राज्यसभा सदस्य मेरी कॉमने आशियाई बॉक्सिंगच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करत पाचव्यांदा सूवर्णपदक जिंकण्याच्या जवळ पोहोचली आहे. मंगळवारी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात मेरी कॉमने जपानची बॉक्सर सुबासा कोमुराचा ५-० असा एकतर्फी पराभव केला.

सामन्याच्या सुरुवातीपासून मेरी कॉमने आक्रमक खेळ करत विरोधी खेळाडूला दबावात आणले. त्यानंतर जोरदार पंच मारत जपानच्या सुबासाला हैराण करून सोडले आणि विजय मिळवला. अंतिम सामन्यात तिने विजय मिळवल्यास आशिया कपमध्ये ४८ किलो वजनी गटात सूवर्णपदक जिंकणारी ती पहिला खेळाडू असेल.

ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी मेरी कॉम याआधी ५१ किलो वजनी गटात खेळत होती आणि त्यात तिने चार वेळा सूवर्णपदक जिंकले आहे. २००३, २००५, २०१० आणि २०१२मध्ये तिने सूवर्णपदकावर नाव कोरले आहे. तर, २००८ला तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.