मेरी कोम, सोनिया अंतिम फेरीत

मेरी कोमने पहिली हिंदुस्थानी महिला विश्वविजेती मुष्टीयोद्धा म्हणून ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

सामना ऑनलाईन । हो चि मिन्ह सिटी

पाचवेळची जगज्जेती एम. सी. मेरी कोम आणि सोनिया लाथेर या हिंदुस्थानी महिला खेळाडूंनी आपापल्या वजनी गटातून आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. दुसरीकडे चारवेळच्या सुवर्णपदक विजेत्या एल. सरिता देवीला यावेळी कास्यपदकावर समाधान मानावे लागले.

३५ वर्षीय मेरी कोमने सहापैकी पाचवेळा या स्पर्धेची फायनल गाठण्याचा पराक्रम केलाय. पाच वर्षे ५१ किलो गटात खेळणारी मेरी कोम आता ४८ किलो गटात खेळत आहे. पाचव्या सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर असलेल्या मेरी कोमने सुवर्णपदकाला गवसणी घातल्यास ४८ किलो गटातील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक असेल. वर्षभरानंतर रिंगमध्ये उतरलेल्या मणिपूरच्या मेरी कोमने जपानच्या सुबासा कोमुरा हिचा ५-० गुणांनी धुव्वा उडवला. सोनिया लाथेरने ५७ किलो गटाच्या उपांत्य लढतीत उझबेकिस्तानच्या योदगोराय मिर्झेवा हिचा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली.

हिंदुस्थानच्या पाच बॉक्सर्सना कास्य

मात्र दुसरीकडे चारवेळच्या सुवर्णपदक विजेत्या एल. सरिता देवीला ६४ किलो वजनी गटात कास्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला उपांत्य लढतीत चीनच्या दोऊ डॅन हिच्याकडून अनपेक्षितपणे पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. याचबरोबर प्रियंका चौधरी (६० किलो), लोवलिना बोर्गोहैन (६९ किलो), सिमा पुनिया (८१ किलो) व शिक्षा (५४ किलो) यांनाही कास्यपदकावरच समाधान मानावे लागले.