मेरी कॉमचा ‘सुवर्ण पंच’, आशियाई बॉक्सिंग स्पर्धेवर विजयाची मोहोर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या एम. सी. मेरी कॉमने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. ४८ किलो वजनाच्या गटात मेरी कॉमने उत्तर कोरियाच्या पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या किम हँग मी हीचा ५-० अशा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. हे सुवर्ण पदक जिंकून मेरी कोमने तिच्या टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले आहे.

आतापर्यंत ५१ किलो वजनी गटातून खेळणारी मेरी कॉम प्रथमच ४८ किलो वजनी गटातून खेळली आहे. २०१६ मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कॉमला पात्र देखील ठरता आले नव्हते. त्यामुळे मेरी कॉमची कारकीर्द संपुष्टात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र तिच्यावर होणाऱ्या टीकांकडे दुर्लक्ष करत तिने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी तयारी सुरू केली होती. गेल्या तीन वर्षापासून बॉक्सिंग पासून दूर राहिलेल्या मेरी कोमचे हे पाचवे सुवर्ण पदक आहे. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिकचं कांस्यपदक पटकावणाऱ्या मेरी कोमचं हे दणदणीत पुनरागमन ठरले आहे.

मेरी कॉमने पाचव्यांदा आशिया बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी मेरी कॉम याआधी ५१ किलो वजनी गटात खेळत होती. मेरॉ कॉमने आशिया बॉक्सिंगमध्ये २००३, २००५, २०१० आणि २०१२मध्ये सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. तर, २००८ला तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.