मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झाला नाही, चीन पुन्हा आडवा आला

सामना ऑनलाईन, जिनीव्हा

मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे सगळे प्रयत्न चीनमुळे असफल झाले आहेत. अमेरिका आणि फ्रान्सने 27 फेब्रुवारीला अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे अशी विनंती केली होती. मात्र चीनच्या विरोधामुळे संयुक्त राष्ट्रांना ही विनंती मान्य करता आली नाही.


चीनने यापूर्वी तीन वेळा मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होऊ देण्यास विरोध केला होता आणि हिंदुस्थानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले होते. आता चौथ्यांदा चीनने आडकाठी केल्याने हिंदुस्थानच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा झटका बसला आहे.

अमेरिका आणि फ्रान्स यांनी अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 अल कायदा बंदी समितीच्या अंतर्गत प्रस्ताव मांडला होता. मात्र संयुक्त राष्ट्राचा स्थायी सदस्य असलेल्या चीनने याला अपेक्षेप्रमाणे विरोध केला. चीनच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निराशा व्यक्त केली आहे. आम्ही याबाबत अन्य काही पर्याय आहेत का याची चाचपणी करीत आहोत असं या मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मागणीला 10 देशांनी समर्थन दिलं होतं. समर्थन करणाऱ्या या देशांचे आम्ही आभारी आहोत असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.