परीक्षेला मोबाईल घेऊन बसलेले शेकडो मुन्नाभाई भरारी पथकाने पकडले

सामना ऑनलाईन, परभणी

परभणीमधील राणीसावरगाव इथल्या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने गुरुवारी धाड टाकली. या धाडीमुळे २५ परिक्षार्थी नकला करताना रंगेहाथ पकडण्यात यश आलं आहे. जि.प.प्रशालेचे विभाजन करून निर्माण झालेले नवीन परीक्षा केंद्र रद्द करण्यासाठी चर्चेत आलेले परीक्षा केंद्र आता कॉपीखोर केंद्र म्हणून चर्चेत आले आहे. नक्कल करणारे सर्वाधिक मुले कागदोपत्री चालणाऱ्या प्रथमेश विद्यालय सिरसम येथील असल्याचं उघड झालं आहे.

गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे जि.प. प्रशालेच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर सुमारे ७०० परिक्षार्थी परीक्षेला बसले असून इंग्रजी विषयाच्या पेपरला गुरूवारी ५९९ परिक्षार्थ्यांनी परीक्षा दिली असल्याची माहिती परीक्षा केंद्र संचालक मुख्याध्यापक रावसाहेब कातकडे यांनी दिली आहे. जेवन्हा भरारी पथकाने  परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली तेव्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन, प्रश्नसंच जवळ बाळगल्याचे आढळून आले.

शिक्षण विभागाच्या पथकाने परीक्षा केंद्राला भेट देऊन तीन तास ठिय्या मांडला होता, या काळात पाच मोबाईल फोनसह सुमारे २५ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. विशेष म्हणजे या नक्कल करणाऱ्यांमध्ये एकही विद्यार्थिनीचा समावेश नाही. या कॉपी करणाऱ्या मुलांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ती सगळी प्रथमेश विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. या सगळ्यांना दहा ते पंधरा हजार रुपयांमध्ये पास होण्याची हमी देण्यात आली होती, पास व्हायचं असल्याने आपल्यापुढे कॉपी करण्याशिवाय पर्याय नव्हता असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं.