Priyanka Gandhi – प्रियंकांचा फर्स्ट डे फर्स्ट शो तुफान हिट

2

सामना ऑनलाईन,लखनौ

सक्रिय राजकारणात आल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांचा आज पहिलाच उत्तर प्रदेशचा दौरा ‘फस्ट डे फस्ट शो’ हिट ठरला. लखनौ येथे प्रियंका यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह जबरदस्त रोड शो केला.

पाहा Photo – प्रियंका गांधींच्या ‘रोड शो’ला जबरदस्त प्रतिसाद

या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उदंड उत्साह आणि तुफान गर्दी उसळली होती. दिल्लीहून लखनौ विमानतळावर आगमन झाल्यानंतर दुपारी 1.10च्या सुमारास खुल्या बसमधून रोड शोला सुरुवात झाली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध ‘देश का चौकीदार चोर हैं’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

चार दिवस भेटीगाठी

रोड शोनंतर प्रियंका गांधी-वढेरा चार दिवस लखनौतील पक्षाच्या मुख्यालयात मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि आढावा बैठक घेणार आहेत.

पाच तास, 15 किमी

विमानतळ ते हजरतगंज येथील प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या नेहरू भवन हे 15 कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी सुमारे पाच तास लागले.

प्रियंका यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे 42 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. त्यात वाराणसी, गोरखपूरही आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशातील 38 मतदारसंघ आहेत.

रोड शोदरम्यान तीन वेळा वाहने बदलावी लागली. बसची उंची जास्त असल्याने विजेच्या तारांचा अडथळा आल्याने कारच्या टपावर बसून रोड शो सुरू ठेवला. त्यानंतर उघडय़ा ट्रकमधून रोड शो पूर्ण केला.