मंगेशकर कुटुंबीयांकडून ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारां’ची घोषणा

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या 30 वर्षांत आपली आगळी-वेगळी ओळख बनविणाऱ्या पुणे स्थित आणि नोंदणीकृत चॅरिटेबल संस्था मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे यावेळी संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले जात आहे. प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून प्रत्येक वर्षी दिले जाणारे हे पुरस्कार या वेळी बुधवारी, म्हणजेच 24 एप्रिल, 2019 रोजी मुंबई येथील षण्मुखानंद हॉल येथे पार पडणार आहेत.

सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असणार आहेत आणि यावर्षीच्या विजेत्यांना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. तसेच या वर्षीचे संगीत आणि कला क्षेत्रातील नामवंत शास्त्रीय नर्तकी श्रीमती सुचेता भिडे-चापेकर यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना प्रदान करण्यात येईल. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात येईल. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित केले जाईल. साहित्य क्षेत्रात वसंत आबाजी डहाके यांना वाग्विलासिनी पुरस्कारांनी पुरस्कृत केले जाईल.

भद्रकाली प्रॉडक्शनचे ‘सोयारे सकाळ’ हे नाटक मोहन वाघ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरविण्यात येईल. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सीआरपीएफ डायरेक्टर जनरल विजयकुमार यांना गृह मंत्रालयाअंतर्गत हिंदुस्थानी जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी मान्यताप्राप्त संस्था ‘भारत के वीर’ साठी सम्मानित केले जाईल.

या वेळी हा पुरस्कार जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना समर्पित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शहीदाना श्रद्धांजली स्वरूप लता दीदी, त्यांच्या पिता मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक कोटी रुपये दान म्हणून देतील. या पुरस्कारांची घोषणा करताना, हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी सांगितले, “एक गायक, संगीतकार आणि मंच कलाकार म्हणून मास्टर दीनानाथचे अमूल्य योगदान स्मृती मंगेशकर कुटुंब प्रत्येक वर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार आयोजित करतो ज्याद्वारे विशिष्ट व्यक्तींना सन्मानित केले जाते. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की, हे आमच्या या अद्वितीय कार्यात सगळ्याच लोकांकडून भरपूर मदत मिळत राहिली आहे.”