हिंदुस्थान ‘अ’चे चोख प्रत्युत्तर,रविकुमार अभिमन्यू यांची अर्धशतके

सामना ऑनलाईन, बंगळुरू

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने पहिल्या डावात 109 षटकांत  346 धावसंख्या उभारल्यानंतर हिंदुस्थान ‘अ’ संघाने उर्वरित 70 षटकांच्या खेळात 3 बाद 223 धावसंख्येपर्यंत मजल मारून ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला चोख प्रत्युत्तर दिले. रविकुमार समर्थ (83) व अभिमन्यू ईश्वरन (86) या सलामीच्या जोडीची अर्धशतके रविवारच्या खेळाची वैशिष्टय़े ठरली. त्या आधी सकाळी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा कर्णधार मिचेल मार्शने नाबाद शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाला समाधानकारक मजल मारून दिली.

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला प्रत्युत्तर देताना रविकुमार समर्थ आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी 47.5 षटकांत 174 धावांची सलामी देत हिंदुस्थान ‘अ’ संघाला खणखणीत सुरुवात करून दिली. रविकुमारने 126 चेंडूंत 83 धावा करताना 8 चौकार लगावले. अभिमन्यूने 165 चेंडूंत 10 चौकारांसह 86 धावा फटकावल्या. ऍस्टोन एंगरने रविकुमारला पायचीत  करून ही जोडी फोडली, तर अभिमन्यू दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. आलेला अंकित बावणेही 13 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार श्रेयस अय्यर 30, तर शुभम् गील 6 धावांवर खेळत होते.

त्या आधी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने शनिवारच्या 6 बाद 290 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र 44 धावांवर नाबाद परतलेला मिचेल नेसर रविवारी त्याच धावसंख्येवर बाद झाला, मात्र 86 धावांवर नाबाद परतलेल्या कर्णधार मिचेल मार्शने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून 204 चेंडूंत 16 चौकार व एका षटकारासह नाबाद 113 धावांची खेळी करून ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. हिंदुस्थानकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 5 फलंदाज बाद केले. शाहबाझ नदीमने 3, तर रजनीश गुरबानी व कृष्णप्पा गौथम यांनी 1-1 बळी टिपला.