‘राणी’च्या स्वागतासाठी माथेरानकरांच्या पायघड्या

सामना ऑनलाईन । कर्जत

कधी इंजिन घसरल्याने तर कधी तांत्रिक बिघाडामुळे तब्बल १८ महिन्यांपासून यार्डात ‘रुसून’ बसलेली माथेरानची राणी आज पुन्हा एकदा राजेशाही थाटात धावली. झुकुझुकु झुकुझुकुच्या सुरात धुरांच्या रेषा काढत निघालेल्या या राणीच्या स्वागतासाठी माथेरानकरांनी ठिकठिकाणी गर्दी करत जणू पायघड्याच घातल्या होत्या. ती त्याच थाटात आणि त्याच दिमाखात तब्बल पावणेदोन वर्षांनी माथेरान स्थानकात आली तेव्हा वाट पाहत असलेल्या हजारो पर्यटकांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. कुणी फटाक्यांची आतषबाजी केली, कुणी सेल्फी काढले तर कुणी टाळ्यांचा गजर करीत लाडक्या राणीला मानवंदना दिली.

एकाच आठवड्यात दोनदा रुळांवरून इंजिन घसरल्याने ९ मे २०१६ पासून अनिश्चित काळासाठी माथेरानची टॉयट्रेन बंद करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाने पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला होता. माथेरानचा अविभाज्य भागच बनलेली ही ट्रेन लवकरात लवकर सुरू करावी यासाठी माथेरानकरांनी अनेकदा आवाज उठवला, मात्र प्रशासन तांत्रिक कारणे देत वेळकाढूपणा करत होते. अखेर १ नोव्हेंबर रोजी नेरळ स्थानकात रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा माथेरानकरांनी दिला. या दणक्याने हादरलेल्या प्रशासनाने धावाधाव करून युद्धपातळीवर दुरुस्तीची सर्व कामे केली आणि २९ ऑक्टोबर रोजी माथेरान स्थानक ते अमन लॉजदरम्यान टॉयट्रेनची यशस्वी चाचणी केली. त्यामुळे माथेरानची राणी समजली जाणारी ही टॉयट्रेन आज अखेर दिमाखात धावली.

सुरुवातीला पाचच फेऱ्या होणार
माथेरान ते अमन लॉज अशा दिवसातून पाचच फेऱ्या सुरुवातीला होणार असून दोन-तीन महिन्यांत नेरळ ते माथेरान सेवा सुरू करण्यात येईल असे यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.