माथेरानच्या राणीचा नवा थाट

सामना प्रतिनिधी। कर्जत

लवकरच माथेरानची राणी नव्या रुपात आणि नव्या थाटात पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे. या नारॉगेज मिनिट्रेनच्या दोन बोगींना आधुनिक साज बसवण्यात आला आहे. जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नव्या थाटात माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेसाठी येणार आहे. १५ ऑक्टोबर ही माथेरानची राणी नव्या रूपात धावणार आहे.

अतिशय आकर्षक स्वरूपाचे दिसणारे हे डबे आकर्षक रंगानी रंगवण्यात आले आहेत. त्यावर माथेरानच्या निसर्गाशी निगडित चित्रे काढली आहेत. या डब्यांच्या आतील व बाहेरील बाजू अतिशय मनमोहक बनवण्यात आल्या आहेत. सध्या या दोन बोगींची ट्रायल घेण्यात येत आहे. राणीची आसनव्यवस्थाही बदलण्यात आली असून आसनाला गाद्या लावण्यात आल्या आहेत. सध्या माथेरान मार्गात रेल्वेची कामे चालू आहेत. यामुळे अमन लॉज ते माथेरान ही शटलसेवा सुरू आहे.

नेरळ-माथेरान मिनिट्रेन सुरू करण्यासाठी इंजिन सुद्धा परेल लोको शेड मध्ये बनविण्याचे काम सुरू आहे. काही दिवसातच 3 इंजिन,पाच वातानुकूलित डबे,बारा द्वितीय श्रेणीचे डबे नेरळ लोको शेड मध्ये दाखल होणार आहेत. यामुळे नवीन इंजिन आणि नवीन बोग्या असलेली मीनीट्रेन डोंगरदऱ्यातून धावणार आहे. या डब्यांमध्ये एअर ब्रेक प्रणाली बसवण्यात आली आहे. बोगीमधील आसन व्यवस्था गादीच्याच आहेत. तर डबे हिरव्या गार झाडीतून धावणार असल्याने पर्यावरण पूरक हिरव्या रंगात असणार आहेत. बोगीच्या बाहेरील बाजूस माथेरान मधील प्राणी आणि पक्ष्यांचे छायाचित्र चितारली आहेत.

1980 मध्ये माथेरानच्या राणीचा रंग लाल होता. त्यावेळेस तो रंग निसर्गाशी समरस नसल्यामुळे रेल्वेने तो बदलला होता. आता या बोगीचा रंग बदलल्या मुळे मध्य रेल्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. सध्या नेरळ लोको शेड मध्ये नवीन दोन बोगी दाखल झाल्या आहेत. माथेरान मध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होते. म्हणून पर्यटकांच्या सुरक्षा कारणास्तव जून पासून बंद असलेली मिनिट्रेन ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे.

summary-matheran train in new looks