मतीन भोसले

>>नीलम ताटके<<

फासेपारधी समाज हा पूर्वीपासूनच, अगदी ब्रिटिश काळापासून शापित जिणं जगत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांच्या काळातही या समाजाची प्रगती कासवापेक्षाही मंदगतीने होत आहे. याच समाजातील एक संवेदनशील तरुण मतीन भोसले जो स्वतः संघर्ष करून शिकला, नोकरी मिळवली, तीही सरकारी. त्यामुळे त्याचे तर आयुष्य सुधारले, पण हे सुखच त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. आपण शिकलो, पण इतरांचं काय, जी मुलं भीक मागणं, भंगार वेचणं, शिकार करणं ही कामं करतात, त्यांचं भवितव्य काय? यातूनच ‘प्रश्नचिन्ह’ संस्थेची निर्मिती झाली. ही संस्था अमरावती जिह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे आहे. या मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेत आज वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली चारशे सत्तेचाळीस मुले आहेत आणि त्यांना शिकविणारे अकरा शिक्षक सामाजिक दायित्वाच्या भावनेने शिक्षकाचे काम करत आहेत. त्यांच्या शाळेचं नाव ‘प्रश्नचिन्ह’च आहे. ही निवासी शाळा आहे. २०१२ मध्ये ही शाळा सुरू करण्यासाठी मतीन भोसले यांनी स्वतःकडची रक्कम तर घातलीच, परंतु घरच्या चार बकऱ्या विकून कुडाच्या भिंतीची शाळा सुरू केली. फळा, खडू, पुस्तकंही याच पैशांतून खरेदी केली. त्यांच्या मागे समाजातील काही दानशूर व्यक्ती उभ्या राहिल्या. त्यापूर्वी त्यांनी ‘आदिवासी फासेपारधी सुधार समिती’ स्थापन केली व त्याद्वारे त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. या मुलांना शिक्षण देण्याचा, सुसंस्कारित माणूस घडवण्याचा प्रयत्न मतीन करीत आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मुलांना सकाळी आंघोळीपासून रात्री झोपण्यासाठीच्या अंथरुणापर्यंतच्या साधनांची मदत हवी आहे. मतीन स्वतः ही मदत मिळविण्यासाठी धडपड करत आहेतच, पण त्यांना शासनाकडून मदत मिळायला हवी.