23 मे ‘मोदी दिवस’ किंवा ‘लोक कल्याण दिन’ म्हणून साजरा व्हावा – रामदेव बाबा

89

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

23 मे हा दिवस ‘मोदी दिन’ किंवा ‘लोक कल्याण दिन’ म्हणून साजरा व्हावा, अशी मागणी योगगुरू रामदेव बाबा यांनी केली आहे. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. पतंजलीचे दुग्धजन्य पदार्थ बाजारात आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रश्न करण्यात आला, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

रामदेव बाबा म्हणासे, ‘एका बाजूला महाआघाडी होती, तर दुसऱ्या बाजूला फक्त मोदी. त्यांनी निवडणुकीमध्ये चांगली लढत दिली आणि विक्रमी जागा जिंकल्या, तसेच उत्तर प्रदेशमध्येही सर्वाधिक जागा जिंकल्या. देशातील नागरिक आता त्यांच्या हाताखाली सुरक्षित आहेत. 23 मे या दिवशी भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे हा दिवस मोदी दिवस किंवा लोक कल्याण दिवस म्हणून साजरा व्हावा.’

लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएने 352 जागा जिंकून इतिहास रचला. इतिहासामध्ये पहिल्यांदाच बिगरकाँग्रेसी सरकार बहुमताने सलग दुसऱ्यांदा सत्तेमध्ये आले आहे. एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 30 मे रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. मोदी सलग दुसऱ्यांदा हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. यावेळी देशविदेशातील बडे नेते, राजकीय व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या