
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही संशयास्पद व्यवहार झाले हे व्यवहार करणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती आणि लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांचंही नाव समोर आलं आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने या दोघींच्या व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. या दोघींव्यतिरिक्त दक्षिणेतील अत्यंत धनाढ्य व्यावसायिक शेखर रेड्डी यांचंही नाव या यादीमध्ये सामील आहे.
नोटाबंदीनंतर ११ हजार कोटींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी घोटाळेबाजांनी धडपड केल्याचं सांगितलं जात आहे. ईडीच्या कागदपत्रांवर नजर टाकल्यास आत्तापर्यंत काळा पैसा पांढरा केल्याची ४ हजार प्रकरणे समोर आली आहेत. ८ नोव्हेंब २०१६ ते ८ सप्टेंबर २०१७ दरम्यान समोर आलेल्या या प्रकरणांमध्ये ईडीने फेमा आणि मनी लाँड्रींग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ईडीने आत्तापर्यंत ५४ लोकांना अटक केली असून ६०० कंपन्यांकडून संशयास्पद व्यवहाराबद्दल तपशील मागविला आहे.
ईडीने माहिती दिली आहे की काळा पैसा संयुक्त अरब अमिराती, दुबई, हाँग काँग, मलेशिया या देशांमध्ये लपवण्याचे प्रयत्न झाले आहेत. या देशांकडून माहिती मिळावी यासाठी त्यांना विनंतीपत्रंही पाठवण्यात आली आहेत.