‘गिल्बर्ट हिल’वर खोदकाम करणाऱ्या विकासकावर गुन्हा दाखल करा, महापौरांचे निर्देश

59

सामना प्रतिनिधी, मुंबई

अंधेरी पश्चिम येथील पुरातन वास्तू गिल्बर्ट हिल येथे बेकायदा खोदकाम केल्यामुळे हेरिटेज वास्तूसह परिसरातील इमारती, मंदिराला धोका निर्माण झाला आहे. याची गंभीर दखल महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी घेतली असून संबंधित विकासकाची चौकशी करून गुन्हा दाखल करा, असे निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना आज दिले आहेत.

पुरातन वास्तू म्हणून ओळख असलेल्या गिल्बर्ट हिल टेकडीच्या ठिकाणी विकासक मे. कॉडकॉन बिल्डर्स प्रा. लि.कडून बेकादेशीरपणे खोदकाम सुरू आहे. हा प्रकार उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर महाडेश्वर यांनी पालिका अधिकाऱयांसह महत्त्वपूर्ण बैठक घेतली. नगर भूमापन क्रमांक 250 इ, 251, 254 सी आणि 254 डी या भूभागावर गिल्बर्ट हिल ही 61 मीटर मोनोलिथ कॉलम असून 65 वर्षे जुनी आहे. या पुरातन वास्तूच्या ठिकाणी विकासकाला केवळ माती खोदण्याची परवानगी असताना संपूर्ण टेकडीवर खोदकाम सुरू असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. महापौर दालनात झालेल्या बैठकप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, नगरसेवक अनंत (बाळा) नर, माजी नगरसेवक संजय पवार, उपविभागप्रमुख प्रसाद अहिरे, उदय महाले, विजय धुमाळ आदी उपस्थित होते.

परिसरातील इमारतींना धोका
पुरातन वास्तूच्या परिसरात बेकायदा खोदकाम करून विकासक बांधकामाकरिता जागा बनवत असल्याचे समोर आल्याचे महापौरांनी निदर्शनास आणून दिले आहे. या खोदकामामुळे या ठिकाणच्या गावदेवी मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय खोदकामात निर्माण होणाऱया लहरींमुळे आसपासच्या इमारतींनाही धोका निर्माण होऊ शकतो. अनेक जिऑलॉजिस्टकरिता ही टेकडी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवावे, या कामाची चौकशी करण्यात यावी आणि टेकडी परिसराचे सर्वेक्षण करून क्षेत्रफळ निश्चित करावे, असे निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या