गुरुभक्तीतून समाधान


संगीतकार नीलेश मोहरीर. स्वामी उमानंद सरस्वतींना तो गुरुस्थानी मानतो.

 • आपलं आवडतं दैवत? – स्वामी उमानंद सरस्वती.
 • त्यांचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? – मला वाटतं, गुरूंचं कौतुक आपण करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. ते सर्वसिद्धिप्राप्त असतात. त्यांचं कौतुक करण्याची आपली योग्यता नाही. मला शब्दच सुचणार नाहीत.
 • संकटात ते तुम्हाला कशी मदत करतात, असं वाटतं? – मुळात खऱ्या गुरूभक्ताच्या आयुष्यात संकट अशी काही संकल्पनाच उद्भवत नाही. कोणत्याही परिस्थितीत संकट वाटणारच नाही. गुरूभक्ताला संकटजन्य परिस्थिती अशी नसते.
 • कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? – कलेतून स्वतःचा शोध घेणं हीच खरी भक्ती आहे. खूप जण बहिरंगी साधना करत असतात. त्यामुळे कलेतून स्वतःचा शोध घेणं महत्त्वाचं.
 • तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्यांची कशी मदत होते? – संपूर्णपणे त्यांचीच कृपा आहे. त्यामुळे कलेतला ‘क’ही जर मला थोडा-फार कळला तर तो त्यांच्याच कृपेने.. कारण गाणं मला आपसूक यायला लागलं. ते माझ्यासाठी स्वाभाविक होतं. त्यामुळे त्यांचं कुतूहलही वाटेना. हे मला माहीतच आहे असं वाटायचं.
 • त्यांच्यावर रागावता का? – रागावणं शक्यच नाही.
 • ते तुमचे लाड कसे पुरवतात? – मला जे आवडतंय ते मला करायला मिळतंय, हे खूप मोठे लाड पुरवणं आहे. कारण अनेक माणसं अशी असतात, ज्यांना जे हवं ते  करायला मिळत नाही.
 • गुरूंचं कोणतं स्वरूप आवडतं? – आशीर्वाद देणारं रूप.
 • त्यांच्यापाशी काय मागता? – मी ‘विश्व शांत होऊ दे. लोकांच्या मनात उद्रेक मावळू दे. मानवता टिकून राहू दे.’ असं मागणं मागतो.
 • त्यांच्या आवडीचा नैवेद्य काय दाखवता? – शिरा. कारण ध्यानानंतर त्यांच्या आश्रमात शिऱ्याचा प्रसाद दिला जातो.
 • त्यांची नियमित उपासना कशी करता? – मला नियमित उपासना करायला जमत नाही. दर रविवारी आश्रमात ध्यानाला जातो.