मुंबई विद्यापीठाचे मैदान एमसीए विकसित करणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील मैदानाच्या विकासाची जबाबदारी मुंबई क्रिकेट असोसिएशनने उचलली आहे. त्यामुळे लवकरच हे मैदान अधिक चांगल्या पद्धतीने विकसित होणार असल्याची माहिती, उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. प्र-कुलगुरू, सिनेट सदस्य तसेच एमसीए अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

एमसीएने मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेला मैदान उपलब्ध करून दिले नव्हते. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन केळंबेकर, मिलिंद साटम, शीतल शेठ-देवरुखकर, युवासेना कार्यकारी सदस्य साईनाथ दुर्गे, कालिदास कांदळगावकर आदी पदाधिकार्‍यांनी रवींद्र वायकर यांची भेट घेतली व या संदर्भात बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या बैठकीला एमसीएचे डॉ. उन्मेष खानविलकर, सुधीर नाईक, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुळकर्णी, डॉ. उत्तम केंद्रे तसेच सिनेट सदस्य उपस्थित होते.

  • विद्यापीठाने क्रिकेट खेळणार्‍या विद्यार्थ्यांकडून बाँड लिहून घ्यावा, अशी सूचना सिनेट सदस्यांनी मांडली. ही सूचना सर्वानुमते मान्य करण्यात आली.
  • स्पर्धा अर्धवट सोडणार्‍या मुलांवर कारवाई करण्यात येऊ नये, मुंबई विद्यापीठ तसेच एमसीएने एकमेकांना दिलेली पत्रे मागे घेण्यात यावीत, या पुढे स्पर्धेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांकडून बाँड लिहून घेण्यात यावे, असे निर्देश वायकर यांनी विद्यापीठ तसेच एमसीएच्या अधिकार्‍यांना दिले.
  • मुंबई विद्यापीठाचे क्रीडांगण एमसीएमने विकसित करावे, यावर विद्यापीठाचा 75 टक्के तसेच एमसीएचा 25 टक्के अधिकार राहील, असेही वायकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
  • या निर्णयामुळे पुढील महिन्यात मुंबई विद्यापीठाची आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचा मार्ग खुला झाला आहे.