मॅकडोनाल्डची १६९ फ्रँचायझी रेस्टॉरंट बंद होणार, हजारों कामगार बेरोजगार होण्याची शक्यता

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कनॉट प्लाजा रेस्टॉरंट लिमिटेड (सीपीआरएल) या साखळी रेस्टारंट चालवणाऱ्या कंपनीबरोबर झालेल्या वादामुळे मॅकडोनाल्ड इंडियाने उत्तर आणि पूर्व भारतातील सुमारे 169 फ्रँचायझी रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमधील करार रद्द करत असून या पुढे आमच्या ब्रँडचा वापर कोणत्याही प्रकारे केला जाऊ नये, असे मॅकडोनाल्ड इंडियाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मॅकडोनाल्ड इंडिया आणि सीपीआरएलमधील वादामुळे फ्रँचायझी रेस्टारंटमध्ये असलेले हजारो कर्मचारी बेरोजगार होण्याची शक्यता आहे.

कनॉट प्लाजा रेस्टॉरंट लिमिटेड (सीपीआरएल)चे प्रमुख विक्रम बख्शी यांच्याशी झालेल्या वादामुळे फ्रँचायझी करार रद्द करण्याचा निर्णय मॅकडोनाल्ड इंडियाने घेतला आहे. दिल्लीतील सीपीआरएलने फ्रँचायझी घेतलेले सुमारे 43 रेस्टॉरंटच्या खाद्य परवान्यांचे नूतनीकरण स्थानिक पालिका प्रशासनाने न केल्यामुळे गेल्या आठवडय़ात बंद करण्यात आले. मॅकडोनाल्ड इंडिया आणि सीपीआरएल हे या फ्रँचायझी व्यवसायातील भागीदार आहेत.

सीपीआरएल आणि मॅकडोनाल्ड इंडिया प्राईव्हेट लिमिटेड यांच्यातील करार रद्द झाल्यामुळे ज्या खाद्य परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही, अशा सीपीआरएलच्या फ्रँचायझी रेस्टॉरंटला फटका बसणार आहे.

मॅकडोनाल्डच्या फ्रँचायझीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून 2014 साली विक्रम बख्शी यांची हकालपट्टी केल्यामुळे बख्शी आणि मॅकडोनाल्ड इंडिया मध्ये वाद सुरू झाला होता.

सीपीआरएलने रेस्टॉरंटवर परिणाम होतील अशा प्रकारे फ्रँचायझी करारातील अटींचा भंग केला. त्यामुळे दोघांमधील करार रद्द केला असून मॅकडोनाल्ड इंडिया कंपनी नवीन भागीदार शोधत आहे.