1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’


सामना प्रतिनिधी । मुंबई

स्वप्नील जोशीचा बहुप्रतीक्षित ‘मी पण सचिन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. हिंदुस्थानात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदुस्थानी प्रेक्षक आणि क्रिकेट यांचे अगदी दृढ नाते आहे. हेच नाते एका वेगळ्या रूपात ‘मी पण सचिन’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर  येणार आहे.

स्वप्नांचा पाठलाग करणे कधीही थांबवू नका, असा आशावादी विचार या चित्रपटातून व्यक्त होत आहे. गावात राहणारा एक तरुण, लंडनच्या लॉड्स मैदानावर क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याची असणारी लढाई, हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे. स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, सुहिता थत्ते अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे. इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या 1 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.