लैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी एका महिलेने केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असून काही अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत. हा अहवाल बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील विनोद राय यांना सादर होणार आहे. त्यामुळे त्या ‘बीसीसीआय’ अधिकाऱ्याचा पाय आणखी खोलात गेला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे समजत आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने आपले शोषण केल्याचा आरोप केला होता. हा आरोप ‘बीसीसीआय’ने फारसा गंभीरपणे घेतला नव्हता. पण त्यानंतर ‘मी टू’ मोहीम सुरू झाली आणि या महिलेने या मोहिमेअंतर्गत ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याचा पर्दाफाश केला. त्यानंतर ‘बीसीसीआय’ने जोहरी यांच्यावर कारवाई केली.

‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीमधील डायना एडल्जी, ‘बीसीसीआय’चे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील याचिकाकर्ते आदित्य वर्मा या तिघांची एक चौकशी समिती तयार करण्यात आली होती. या समितीपुढे विनोद राय आणि अनिरुद्ध वर्मा यांनी जबाब नोंदवला आहे. या चौकशी समितीचा अहवाल 15 नोव्हेंबरला बीसीसीआयपुढे सादर करण्यात येणार आहे. या अहवालाचा अभ्यास केल्यावर जोहरी यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.