…काय महिमा वर्णू तिचा हो।।

700

>> माधव डोळे

नऊ दिवसांच्या या उत्सवात मूळमायेची आरती समर्थ रामदास स्वामींनी रचली आहे. काय आहे तिचा अन्वयार्थ…

नऊ दिवसांच्या या आदिशक्ती उत्सवात गोंधळ, जागरण, गजर याबरोबरच देवीच्या म्हटलेल्या आरत्या हा एक महत्त्वाचा भाग असतो.एरवी कोणत्याही उत्सवात फारशी म्हटली न जाणारी एक आरती म्हणजे आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो.. महाराष्ट्रातील नवरात्रोत्सवात ही आरती जिथे घटस्थापना केली आहे अशा घरांमधून तसेच मंदिरांमधून हमखास म्हटली जाते. खरं तर ही आरती नाही. समर्थ रामदासांनी रचलेले ते देवीचे पद आहे. तरीही या रचनेला ’आरती’ म्हणून लाखो भक्तांनी स्वीकारले असून ही अनेकांची आवडती आरती आहे.

रामदासांची ओघवती शैली

समर्थांची मूळ रचना आणि आपण जी आरती म्हणून नवरात्रात म्हणतो त्यात खूप फरक आहे. रचनांमध्ये गेल्या चारशे वर्षांत कोणी बदल केला माहीत नाही. पण मूळ रचनेतील ओळीच्या ओळी बदलल्या आहेत. नादमाधुर्यता, देवीचे वर्णन, मनाला संतोष देणारे शब्द यामुळे ही ‘आरती’देखील लोकप्रिय झाली. आरतीच्या शेवटी ‘विप्रा रामदासा’ असे म्हटले आहे. पण समर्थांच्या मूळ पदात ‘रामी रामदासा’ असे म्हटले आहे. आरतीची शेवटची ओळ ‘विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो’ असे आहे. मात्र समर्थ रामदासांच्या मूळ पदरचनेत ‘रामीरामदासा बाईने धरले आपले हाती हो’ असा उल्लेख आढळतो. (श्री समर्थांचा गाथा / पान क्रमांक 365). आरती असो की, पद, त्यातील वरवरचा अर्थ आपण पाहतो. मात्र त्यामागचा गुह्यार्थ शोधण्याच्या भानगडीत आपण पडत नाही. नवरात्रीच्या निमित्ताने ‘अश्विनशुद्धपक्षी’च्या अंतरंगात  शिरण्याचा हा प्रयत्न :

 • अश्विनशुद्धपक्षीच्या मुहूर्तावर प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना करून सिंहासनावर ही अंबा, जगदंबा आरूढ झाली आहे.  नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र हेसुद्धा मूल मंत्राचा जप करून ‘उदो बोला उदो.. अंबाबाई माऊलीचा हो..’ असा जयजयकार करीत देवीची पूजा करीत आहेत. तिचा महिमा काय वर्णावा. ती आदिशक्ती आहे.
 • दुसऱ्या दिवशी चौसष्ट योगिनी म्हणजे सगळ्या शक्ती मिळून देवीची आरती करतात. जगदंबेचा उदय होवो अशा सगळ्या चामुंडा म्हणजे शक्तिदेवता गर्जना करतात. नवरात्र हे शक्तीचे जागरण आहे.    तिसऱ्या दिवशीचा सोज्वळ शृंगार देवीला केला असून मळवट देखील भरला आहे. पातळही छान नेसवलं आहे. देवीने गळ्यात मोत्यांच्या माळा घातल्या असून अष्टभूजा म्हणजे आठ हात असलेलं
 • उपासकाकडे अंबे प्रसन्न अंतःकरणाने बघत असून या अष्टभुजांचं वेगळं महत्त्व आहे. शुंभ व निशुंभ या राक्षसांच्या वधाच्या वेळी देवीने आठ हातांत शस्त्र घेऊन आपलं रूप प्रकट केलं म्हणून ही अष्टभूजा. ते पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, अग्नेय, नैरुत्य, वायव्य, ईशान्य या आठ दिशांचं प्रतीक देखील आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या आठही दिशा उजळून गेल्या आहेत.
 • चौथ्या दिवशी देवीचं स्वरूप हे विश्वव्यापक जननी म्हणजे संपूर्ण विश्वाची माता दिसते असे जाणवते. मूर्तीच्याही पलीकडे गेलेलं हे विश्वात्मक रूप असून सगळं जग जगदंबामय दिसतं. जगदंबा देखील स्पष्ट अंतःकरणाने सर्वांकडे पाहात असून सर्वांगभुती देवीचा साक्षात्कार झाला तर ती प्रसन्न झाल्यासारखीच आहे. सूर म्हणजे देव.. ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव देखील अंबेच्या चरणी लोटांगण घालीत आहेत.
 • नवरात्रोत्सवात पंचमीचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो.  या दिवशी उपांगललिता हे व्रत केले जाते. ही श्री यंत्राची अधिष्ठाता देवता आहे. अर्घ्य व पाद्यपूजनाने म्हणजे शोडषोपचारे आम्ही तुझी पूजा करीत आहोत. रात्रीच्या वेळेला कीर्तन, हरीकथा व भजन करून आम्ही तुझे जागरण करत आहोत. देवीसमोर टिपऱ्या खेळताना किंवा नृत्य करताना आनंद, प्रेम आणि सद्भाव हा जागा होतो.
 • गोंधळ हा नवरात्रोत्सवाचा एक महत्त्वाचा उपचार आहे. हातात दिवटय़ा व काकडे घेऊन हा गोंधळ घालण्याची प्रथा आहे. यावेळी देवीची स्तुती गाण्यांमधून केली जाते. देवीचा अलंकार म्हणजे कवडय़ांची माळ. ते सृजनाचे प्रतीक आहे. देवीला एक कवडी अर्पण केली तर ती आपल्याला मुक्त फलांचा हार देईल अशी श्रद्धा आहे. या दिवशी जोगवा मागितला जातो.
 • महिषासुराच्या मर्दनानंतर देवीचे वास्तव्य सप्तशृंगी गडावर होते.  अजूनही तेथे तिचा वास आहे अशी श्रद्धा आहे. सातव्या दिवशी जाई, जुई तसेच शेवंतीने पूजा केली जाते. ज्या गडावर तुझा वास आहे तिथे  सभोवताली विविध प्रकारची पुष्पे असून तुझीच पुष्पे तुला अर्पण करीत आहे. भक्त संकटात पडला तर त्याला वरच्यावर झेलून संकटातून तू वाचवतेस.
 • समर्थ रामदासांनी केलेले अष्टमीचे वर्णन तुळजाभवानीला लागू पडते. कारण ती देखील अष्टभुजा आहे. सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जगननी हो.. याचा अर्थ ही तुळजाभवानी सह्याद्री पर्वतावर उभी असून आईच्या मायेनं ती संपूर्ण विश्वाचे रक्षण करते. या तुळजाभवानीच्या रूपातच जगदंबेचे रूपही सामावले आहे. देवीने भक्ताला मुलासारखं समजून जवळ केलं असून त्याचं अंतःकरण सुखी केलं आहे.
 • नवरात्रीचा नववा दिवस हा पारणे फेडण्याचा म्हणजे उपवास सोडण्याचा आहे. यादिवशी सगळ्या क्रतांची समाप्ती केली जाते. तसेच सप्तशतीचा जप व हवनदेखील करतात. षड्रसअन्ने नैवेद्यासी अर्पियली  भोजनी हो.. या दिवशी सहा रसांचे म्हणजे कडू, गोड, तुरट, खारट, आंबट व तिखट याचे शिजवलेले नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा आहे. माणसातील षड्रिपू म्हणजे सहा विकारांचं दमन करून तुझ्या चरणी आम्ही अर्पण करीत आहोत.
 • दशमी हा नवरात्रीचा शेवटचा दिवस. शुंभ तसेच निशुंभ अशा अनेक राक्षसांचा वध करून देवी सीमोल्लंघनासाठी सिंहावर आरूढ होऊन निघाली आहे. हातात शस्त्रे आहेत आणि रणवाद्ये वाजत आहेत. हा विजयाचा उत्सव असून रामदासांनाही तू आपल्या चरणी आश्रय दिला आहेस.

9चे महत्त्व

 • नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी ही नऊ धान्ये पेरली जातात.
 • शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री हे दुर्गामातेचे नऊ अवतार आहेत.
 • दुर्गादेवीची अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका ही नऊ नाकं आहेत.
 • महाराष्ट्रात वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई), श्री एकवीरादेवी (कार्ला) ही मातेची प्रसिद्ध नऊ देवस्थानं आहेत.
 • रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश या नवग्रहांच्या नऊ समिधा आहेत.
 • नवग्रहांची नऊ रत्नं माणिक, मोती, प्रकाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य, पीतवर्ण-मणी ही आहेत.
 • अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान ही नऊ प्रकारची दानं श्रेष्ठ मानली जातात.
 • शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्केोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ हे प्रसिद्ध नऊ नाग आहेत.
 • मानकी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म म्हणजे धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.
 • आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथून, मंत्र, औषध, दान, मान, अपमान ही नवनाथांच्या नीतीशास्त्रातील नऊ रहस्ये आहेत.
 • नवरात्रींसाठी लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा हे नऊ रंग आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या